www.24taas.com, मुंबई
मुंबई शेअरबाजाराचा सेन्सेक्स आज १६ हजार २६ अंशांवर बंद झाला. त्यात १५६ अंशांची घट झाली. तर राष्ट्रीय शेअरबाजाराचा निफ्टी आज ४ हजार ६८० अंशांवर बंद झाला. त्यात ४५ अंशांची घट झाली. आज सकाळी आशियाई बाजारातल्या तेजीमुळे भारतीय शेअरबाजार सकारात्मक पातळीवर उघडला. सकाळच्या सत्रात बाजारात वाढच होत होती.
तेल कंपन्यांना ३८ हजार ५०० कोटी रुपयांची अतिरिक्त सबसिडी देण्याच्या मागणीला अर्थमंत्रालयानं सहमती दिल्याच्या वृत्तामुळे दुपारी बाजार घसरला. त्यानंतर बाजारातली घसरण कायमच होती आणि शेवटी बाजार नकारात्मक पातळीवर बंद झाला. आज रियॅलिटी आणि FMCG स्टॉक्स घसरले होते. MSCI च्या यादीत समावेश होणार असल्यामुळे केर्न इंडिया, बॅंक ऑफ बडौदा, गोदरेज, ग्राहकोपयोगी वस्तूंचे स्टॉक्स वाढलेले होते. गॅस डिस्ट्रीब्युशन स्टॉक्स सलग दुसऱ्या दिवशी तेजीत होते.
तिमाही अहवालात नफा नोंदवल्यामुळे पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनचे स्टॉक्स वधारले होते. उर्जा उपकरण उत्पादक कंपनी भेलचे स्टॉक्स वाढले होते तर उर्जा निर्मिती कंपनी टाटा पॉवरचे स्टॉक्स घटले होते. शेअर्सच्या किंमती कमी झाल्यामुळे ऑटो स्टॉक्सची खरेदी वाढली होती. तिमाही अहवालानंतर नफ्याच्या वितरणामुळे स्टेट बॅक ऑफ इंडियाचे स्टॉक्स घसरले होते.
तिमाही नफ्याच्या शक्यतेमुळे टाटा स्टीलचे स्टॉक्स वधारले होते. आज टीसीएस, टाटा मोटर्स, भेल, एचडीएफसी आणि व्होकार्ड या वधारलेल्या टॉप पाच कंपन्या होत्या तर टाटा पॉवर, मारूती सुझुकी, स्टर्लाईट इंडिया, एसबीआय आणि हिंडाल्को या घसरलेल्या टॉप पाच कंपन्या होत्या.