www.24taas.com, मुंबई
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंविरुद्ध उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्यात आलीय. मुंबईतल्या शिवाजी पार्क इथं जाहीर सभेस नकार देणाऱ्या उच्च न्यायालयाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याबद्दल ही अवमान याचिका आहे.
न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी राज यांच्यावर कारवाई करुन त्यांना शिक्षा सुनावण्याची मागणी या याचिकेत करण्यात आलीय. राज्याच्या महाधिवक्त्यांनी हिरवा कंदील दाखवल्यानंतर ही याचिका दाखल केली गेली. लवकरच ती सुनावणीसाठी येण्याची शक्यता आहे. अड. एजाज नक्वी यांनी ही याचिका दाखल केलीय.
पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आपल्या पक्षाला शिवाजी पार्कवर सभा घेऊ द्यावी, अशी मागणी मनसेने याचिकेद्वारे केली होती. मात्र, शिवाजी पार्क हे शांतता क्षेत्रात मोडत असल्यानं तसेच एका राजकीय पक्षाला परवानगी दिली तर सगळ्यांनाच ती द्यावी लागेल, असं स्पष्ट करुन न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावली होती. त्यानंतर राज यांनी पत्रकार परिषद घेऊन न्यायालयाचा हा निर्णय पक्षपाती असल्याची शेरेबाजी केली होती.