www.24taas.com, मुंबई
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टोल नाकाविरूद्ध खळ्ळ खट्ट्याक करताच.. टोलनाका वसूली करणाऱ्या ठेकदारांची चांगलीच अडचण झाली आहे.. त्यामुळे अनेक टोलनाके हे बंद करण्यात येत आहेत. बुधवारी रात्री भिवंडी-कल्याण-शीळ मार्गावरील काटई येथील टोलनाका बंद पाडण्यासाठी मनसे कार्यकर्ते गेले पण त्याआधीच टोलनाक्यावरील वसुली बंद करून टोलनाकाचे कर्मचारी पसार झाले होते.
काटई येथील टोलनाका हा अवैधरित्या सुरू होता. टोलनाका वसुलीची मुदत संपली असताना काटई नाक्यावर टोल वसुली केली जात होती. त्यामुळेच तेथे मनसैनिकांना आपल्या मोर्चा वळवला होता. मात्र त्याआधीच टोलनाक्यावरील ठेकेदारासह कर्मचाऱ्यांनी आपला गाशा गुंडाळला होता. मनसेच्या आंदोलनाची चुणूक पोलिसांनाही असल्याने याठिकाणी प्रचंड पोलीस बंदोबस्त होता. पोलीस बंदोबस्त असल्याने कार्यकर्त्यांनाही फारसा "राडा' टोलनाक्यवर करता आला नाही.
संतप्त कार्यकर्त्यांनी टोलनाक्याजवळील स्टॉपच्या फलकाची मोडतोड केली. टोलनाक्यावरील टोलवसुली बंद असल्याचे टोलनाका व्यवस्थापनाने मनसे पदाधिकाऱ्यांना सांगितले. टोलनाक्यावरील वसुली बंद असल्याचे सांगण्यात येत असले असले तरी टोलवसुली सुरू झाल्याचे समजताच कार्यकर्ते कोणत्याही क्षणी टोलनाक्यावर येऊन टोलनाका बंद पाडतील, असा इशाराही मनसेने यावेळी टोलनाका व्यवस्थापनास दिला आहे.