www.24taas.com, मुंबई
मुंबईतल्या हिरानंदानी बिल्डर्सना सुप्रीम कोर्टाने दणका दिला आहे. स्वस्त घर योजनेसंदर्भात हिरानंदानींनी दिशाभूल केल्याचा आरोप करण्यात आला होता. याबाबत हायकोर्टानं हिरानंदानी विरोधात फौजदारी खटला दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर हिरानंदानींनी सुप्रीम कोर्टात धाव घेत याबाबत याचिका दाखल केली होती.
मात्र, सुप्रीम कोर्टाने हिरानंदानींची याचिका फेटाळून लावली. तसंच हिरानंदानींविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करावा, असंही सुप्रीम कोर्टानं सुनावलंय. त्यामुळं एकूणच याप्रकरणी हिरानंदानींसाठी हा मोठा झटका मानण्यात येतोय.
हिरानंदानी बिल्डरनं यापुढं कोर्टाची परवानगी घेतल्याशिवाय पवईत कोणतेही बांधकाम करू नये असे आदेश मुंबई हायकोर्टानं दिले होते. पवईमध्ये दुर्बल घटकांसाठी ३१०४ घरे १३५ रुपये चौरस फुटानं देण्याचे आदेश देत घरांचा ताबा दिल्याशिवाय बांधकामास परवानगी नाकारली होती. सरकारनं हिरानंदानीला पवईमध्ये २३० एकर जागा दिली होती.