२६/११च्या त्रुटी कायम, अहवालाकडे कानाडोळा

मुंबईवर झालेल्या २६/११च्या दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षेच्या त्रुटी संदर्भात चौकशी करण्यासाठी नेमलेल्या राम प्रधान समितीने केलेल्या २६ महत्त्वपूर्ण सूचनांपैकी काहींची अद्याप पूर्तता होऊ शकलेली नाही.

Updated: Nov 29, 2011, 07:14 AM IST

झी २४ तास वेब टीम, मुंबई

 

मुंबईवर झालेल्या २६/११च्या दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षेच्या त्रुटी संदर्भात चौकशी करण्यासाठी नेमलेल्या राम प्रधान समितीने केलेल्या २६ महत्त्वपूर्ण सूचनांपैकी काहींची अद्याप पूर्तता होऊ शकलेली नाही.

 

दहशतवादी विरोधी पथक अधिक बळकट करण्यावर भर देण्यात आला आहे. पण यात येणाऱ्या तांत्रिक बाबींची माहिती अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना दिली. अहवाल सादर केल्यावर आपल्याशी चर्चा करण्यात आली नाही, अशी भावना मध्यंतरी राम प्रधान यांनी व्यक्त केली होती. यावर प्रधान यांची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट घेऊन चर्चा करावी, असा आदेश मुख्यमंत्र्यांनी दिला.

 

असे असताना मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याला अलीकडेच तीन वर्षे पूर्ण झाली. या हल्ल्याच्या संदर्भात नेमलेल्या राम प्रधान समितीच्या अहवालाची कितपत पूर्तता झाली याचा आढावा घेण्याकरिता मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बैठक बोलाविली होती. या वेळी मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड, अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) उमेशचंद्र सरंगी व पोलीस महासंचालक सुब्रमण्यम हे बैठकीला उपस्थित होते. सुरक्षेतील त्रुटी दूर करण्याकरिता प्रधान समितीने २६ महत्त्वपूर्ण सूचना केल्या होत्या.

 

यापैकी ७५ टक्के सूचनांची अंमलबजावणी झाल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. अत्याधुनिक शस्त्रात्रे व उपकरणे संपादित करण्याची अहवालात शिफारस करण्यात आली आहे. पण केंद्र सरकारकडून पुरवठा होण्यात विलंब होऊन काही उपकरणे व शस्त्रे मिळू शकलेली नाहीत.