चंद्रपुरात आढळल्या दोन हजार वर्षांपूर्वीच्या गुंफा!

चंद्रपूर जिल्ह्यातल्या कोरपना तालुक्यात वर्धा नदीच्या खो-याशेजारी घनदाट जंगलात 2 हजार वर्षांपूर्वीच्या महापाषाण काळातल्या 2 गुंफा आढळून आल्यायत.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jul 1, 2013, 10:07 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, चंद्रपूर
चंद्रपूर जिल्ह्यातल्या कोरपना तालुक्यात वर्धा नदीच्या खो-याशेजारी घनदाट जंगलात 2 हजार वर्षांपूर्वीच्या महापाषाण काळातल्या 2 गुंफा आढळून आल्यायत. या भागात सर्वेक्षण करणा-या इतिहास संशोधकांना या गुफा आढळून आल्या आहेत. या नव्या संशोधनामुळं चंद्रपूरच्या ऐतिहासिकेत आणखीनच भर पडली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातल्या वर्धा नदीचा खोरे भाग प्राचीन काळापासून संस्कृतीचा उगम समजला जातो. या खो-याच्या आसपास हिंदू, बौद्ध आणि जैन धर्मियांनी आपल्या साधनेसाठी विविध गुंफा तयार केल्याचे पुरावे सापडलेत. यातल्या काही गुंफा भद्रावती तालुक्यात आहेत तर काही अतिप्राचीन माणिकगड टेकड्यांच्या आसपास. ताजे संशोधन मात्र वेगळ्या पट्ट्यात झालंय. त्यात कोरपना तालुक्यातल्या कारवा जंगलात एकाच दगडाच्या आत कोरलेल्या २ गुंफा आढळल्या आहेत. वालुकामय खडकात कोरलेल्या या दोन्हीही गुंफा अपूर्णावस्थेत आहेत. त्यात अनेक चित्रकृती कोरल्याचं दिसून येतंय. या गुंफांवरून याठिकाणी 2 हजार वर्षांपूर्वी बौद्ध धर्मातल्या हीनयान पंथांच्या साधकांचं वास्तव्य असल्याचं स्पष्ट होतंय.
चंद्रपूर जिल्हा प्राचीन काळापासून हिंदू, बौद्ध आणि जैन धर्म संस्कृतीचा मिलाफ असल्याचा पुरावा मिळतो. आता कारवामध्ये सापडलेल्या गुंफांमुळं चंद्रपूरच्या वैभवात भर पडलीय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.