www.24taas.com, झी मीडिया, नागपूर
नाशिकमधलं चिखलीकर प्रकरण उजेडात आल्यानंतर आता राज्यभरात अशाच प्रकारचे अनेक प्रकार उघड होतायत. नागपुरात गैरव्यवहाराप्रकरणी निलंबित असलेल्या उप अभियंत्यानं आपल्या मुलालाच PWDविभागातली बांधकामाची कंत्राटं दिल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्यांनी केलाय. आणि आपल्या नातेवाईकांना विभागाचं कंत्राट मिळवून देण्याचा हा प्रकार नवा नसल्याचं सांगत कंत्राटदारांनीही त्यांच्या आरोपाला दुजोरा दिलाय.
नागपूरच्या सार्वजनिक बांधकाम विभागातल्या घोटाळ्याप्रकरणी निलंबनाची कारवाई झालेला हा आहे उपअभियंता टोलीराम राठोड... लाचखोर टोलीराम राठोडनं आपल्या मुलाच्या कंपनीलाच सार्वजनिक बांधकाम खात्याचं काम दिल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्यांनी केलाय. सार्वजनिक बांधकाम विभागातले अनेक अधिकारी अशाच प्रकारे आपल्या नातेवाईकांना या विभागातल्या विविध कामांचं कंत्राट देत असल्याची माहिती सोमय्या यांनी सबळ पुराव्यानिशी दिलीय. तर किरीट सोमय्यांच्या या आरोपाला कंत्राटदारांनी दुजोरा दिलाय.
2007 ते 2009 दरम्यान नागपुरात मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान रामगिरी, उपमुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान देवगिरी, मंत्र्यांचे निवासस्थान रवि भवन, विधान भवन या सर्व इमारतींमध्ये खोटं काम आणि महागडे फर्निचर बसवल्याचं सांगून सार्वजनिक बांधकाम विभागातल्या 24 अधिका-यांनी 119 कोटींचा आर्थिक गैरव्यवहार केला होता. यासंदर्भात खात्यामार्फत चौकशी करण्यात आली. या चौकशी अंतर्गत दोषी आढळल्यानं एकाच वेळी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या 24 अधिका-यांना निलंबित करण्यात आलं होतं. त्यात टोलीराम राठोड या उपअभियंत्याचा समावेश आहे. आपल्याला वरिष्ठांना हिस्सा द्यावा लागतो ही तक्रार कनिष्ठ अभियंते आपल्याकडे नेहमी करत असल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केलाय.
किरीट सोमय्यांच्या आरोपाला कंत्राटदार संघटनेनंच दुजोरा दिला असल्यामुळे भ्रष्टाचाराची पाळमुळं किती खोलवर रुजलीयत ते समोर येतं. मात्र आता तरी राज्य सरकारनं काही भूमिका घेतं का ? याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.