आर्थिक गुन्हेगारीची नवी राजधानी- नागपूर!

नागपूरसह विदर्भातल्या शेकडो गुंतवणुकदारांची फसवणूक करणा-या श्री सुर्या कंपनीचे तपशील बाहेर येतायत. त्याचवेळी नागपूरात गेल्या साडेचार वर्षात आर्थिक फसवणुकीचे 1 हजार 283 गुन्हे दाखल झाल्याची माहिती मिळाली आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Oct 29, 2013, 05:53 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नागपूर
नागपूरसह विदर्भातल्या शेकडो गुंतवणुकदारांची फसवणूक करणा-या श्री सुर्या कंपनीचे तपशील बाहेर येतायत. त्याचवेळी नागपूरात गेल्या साडेचार वर्षात आर्थिक फसवणुकीचे 1 हजार 283 गुन्हे दाखल झाल्याची माहिती मिळाली आहे. मात्र यापैकी एकाही आरोपीला अद्याप शिक्षा झालेली नाही. नागपुरात वाढत चाललेल्या आर्थिक गुन्हेगारीवर पाहूया एक विशेष रिपोर्ट
नागपुरातले बडे बांधकाम व्यवसायिक असलेल्या विवेक पाठक यांनी मोठ्या विश्वासानं श्री सुर्या कंपनीत पैसे गुंतवले होते. पण या कंपनीतला घोटाळा उघडकीस आल्यानंतर आपण फसवले गेल्याचं त्यांच्या लक्षात आलं. दाम दुप्पटचे आमिष दाखवत फसवणूक करणारी श्री सुर्या ही एकमेव कंपनी नाही आणि फसवणूक झालेले पाठक हे एकमेव गुंतवणूकदार नाहीत. गेल्या साडेचार वर्षात नागपुरात अशा प्रकारचे 1. 283 गुन्हे दाखल झालेत. या घोटाळयात श्री सूर्याच्या समीर आणि पल्लवी जोशी प्रमाणे जयंत आणि वर्षा झामरे, हरिभाऊ मंचलवार आणि त्यांची पत्नी सहभागी झाले होते.
या सर्व घोटाळ्यातला सामाईक घटक म्हणजे याच घोटाळ्यात पती-पत्नी दोघेही सहभागी झाले आहेत. यामध्ये मोठ्या प्रमाणात काळा पैसा गुंतला असल्याने याची नक्की व्याप्ती सांगणे कठीण आहे. पण किमान ५०० कोटींपर्यंत याची व्याप्ती असू शकते असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केलाय.
आर्थिक घोटाळ्यातल्या आरोपींना कडक शिक्षा तर हवीच. त्याचबरोबर त्यांची मालमत्ता जप्त करुन त्याची तातडीनं विल्हेवाट लावली तरच या घोटाळ्याखोरांना वचक बसू शकेल.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.