www.24taas.com, नागपूर
उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि बसपा प्रमुख मायावती यांनी आज नागपूरमध्ये सभा घेतली. यावेळी भाषणामध्ये महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश बनवून दाखवेन, अशी ग्वाही दिली. महाराष्ट्राचा विकास करून त्याचं उत्तर प्रदेश बनवायचं असेल, तर आम्हाला सत्ता द्या. असं या वेळी मायावती म्हणाल्या.
बसपाच्या राज्यस्तरीय कार्यकर्ता आधिवेशनासाठी महाराष्ट्रात आलेल्या मायावतींनी महाराष्टातील आणि केंद्रातील काँग्रेस सरकारवर सडकून टीका केली. दलितांची मतं जिंकण्यासोबतच इतर जातीतील गरीबांचीही मतं मिळवण्याच्या दृष्टीने मायावतींनी अश्वासनं दिली. आपल्याला कुठल्याही जातीचं राजकारण न करता विकास घडवायचा आहे असं मायावतींनी म्हटलं. इंदू मिलची जागा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी मंजूर झाली, ती केवळ आपल्यामुळेच, असा दावा मायावतींनी केला.
बसपाची सत्ता आल्यास १२ एकर जागेवर नाही, तर २०० एकर जागेवर आंबेडकरांचं स्मारक बांधू, अशी घोषणा मायावतींनी केली. याशिवाय महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज यांचीही भव्य स्मारकं बांधू असं अश्वासन मायावतींनी दिलं.
आरक्षणाच्या आड येणाऱ्या शक्तींचा बिमोड करण्याचं अश्वासनही मायावतींनी दिलं. यासाठी सर्वांची साथ असायला हवी, असं मायावती म्हणाल्या. अल्पसंख्यांक आणि सवर्ण जातीतील गरीबांना आर्थिक निकषांच्या आधारावर वेगळं आरक्षण मिळेल, अशी व्यवस्था करण्यात यावी, असंही मायावती म्हणाल्या.