अडसूळांविरोधात नवनीत राणाची विनयभंगाची तक्रार

अमरावतीचे विद्यमान खासदार आनंदराव अडसूळ यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या उमेदवार नवनीत कौर यांनी विनयभंग आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार पोलिसांत दाखल केलीय. गाडगेनगर पोलीस स्टेशनमध्ये नवनीत यांनी आपल्या पतीसह जावून तक्रार दाखल केली.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Mar 17, 2014, 11:21 AM IST

www.24taas.com,झी मीडिय़ा, अमरावती
अमरावतीचे विद्यमान खासदार आनंदराव अडसूळ यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या उमेदवार नवनीत कौर यांनी विनयभंग आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार पोलिसांत दाखल केलीय. गाडगेनगर पोलीस स्टेशनमध्ये नवनीत यांनी आपल्या पतीसह जावून तक्रार दाखल केली.
अमरावतीमध्ये एका वृत्तवाहिनीच्या धावत्या कार्य़क्रमात बसमध्ये असतांना हा प्रकार घडल्याचं नवनीत यांनी तक्रारीत म्हटलंय. रविवारी या कार्यक्रमासाठी बस कॅम्पवरून इर्विन चौकाकडे जात होती. काही वेळानंतर नवनीत राणा रडवलेल्या चेहऱ्यानं बसमधून उतरल्या आणि त्यांनी थेट पोलीस स्टेशन गाठलं.
याप्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी आनंदराव अडसूळ, शिवसेनेचे कार्यकर्ते नितीन तारेकर, प्रकाश मंजलवार आणि इतर दहा जणांविरुद्ध कलम ३५४, २९४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. नितीन तारेकर आणि मंजलवार यांच्याविरुद्ध अॅट्रॉसिटी अॅक्टनुसारही गुन्हा दाखल झाला. ही घटना नवनीत राणा यांच्या तक्रारीनुसार बसमध्ये घडलेली आहे. या बसमध्ये तक्रारकर्त्यांसह खा. आनंदराव अडसूळ, गुणवंत देवपारे आणि अन्य लोकसुद्धा होते. वृत्तवाहिनीकडील कार्यक्रमाचे फुटेज तपासल्यानंतर पुढील कारवाई करू, असे पोलिस उपायुक्त एम. एम. घार्गे यांनी सांगितलं.
दरम्यान, वृत्तवाहिनीचा कार्यक्रम जाहीरपणे आणि अनेकांच्या उपस्थितीत झाला. अमरावती लोकसभेचे इतर उमेदवारही होते. या साऱ्यांच्या उपस्थितीत असभ्य प्रकार करणं कसं शक्य आहे, असा सवाल आनंदराव अडसूळ यांनी तातडीनं घेतलेल्या पत्रपरिषदेत केला.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो
करा.