दर्डांच्या कंपन्यांवर छापे

कोळसाकांडावरून संसदेचं कामकाज ठप्प असताना सीबीआयनं कोळसा खाण कंपन्यांच्या कार्यालयांवर ठिकठिकाणी छापे टाकले. त्यातच भाजप नेते किरीट सोमय्यांनी ज्यांच्यावर आरोप केलेत त्या काँग्रेस खासदार विजय दर्डांच्या कंपन्यांवर छापे टाकल्यानं खळबळ उडालीय.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Sep 5, 2012, 08:33 AM IST

www.24taas.com, नागपूर
कोळसाकांडावरून संसदेचं कामकाज ठप्प असताना सीबीआयनं कोळसा खाण कंपन्यांच्या कार्यालयांवर ठिकठिकाणी छापे टाकले. त्यातच भाजप नेते किरीट सोमय्यांनी ज्यांच्यावर आरोप केलेत त्या काँग्रेस खासदार विजय दर्डांच्या कंपन्यांवर छापे टाकल्यानं खळबळ उडालीय.
कोळसा खाण घोटाळा प्रकरणी काँग्रेस खासदार विजय दर्डा प्रमोटर असलेल्या जेएलडी यवतमाळ एनर्जी लिमिटेडसह पाच कंपन्यांवर छापे टाकल्यानंतर सीबीआयनं एफआयआर दाखल केला. यामध्ये खासदार दर्डा यांच्यासह त्यांचे पुत्र देवेंद्र दर्डा आणि राज्याचे शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा, मनोज आणि अभिषेक जैसवाल यांची नावं आहेत. सीबीआयमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यवतमाळ एनर्जीचे संचालक या नात्यानं विजय दर्डा यांचं नाव एफआयआरमध्ये टाकण्यात आलंय.
या कंपनीनं छत्तीसगडमधला फतेपूर ईस्ट कोल ब्लॉक मिळविताना केलेल्या कथित भ्रष्टाचाराप्रश्नी सीबीआय चौकशी करत आहे. खासदार दर्डा यांनी मात्र हे आरोप फेटाळलेत. राजेंद्र दर्डांनी जेएलडी कंपनीशी आपला संबंध नसल्याचं सांगत 2008 सालीच शेअर्स विकल्याचा खुलासा केलाय.
जेएलडी कंपनीत खासदार विजय दर्डा प्रमोटर आहेत, तर त्यांचे पुत्र देवेंद्र डायरेक्टर आहेत. तर जेएएस इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये विजय दर्डा आणि मनोज जैस्वाल प्रमोटर आहेत. जेएलडी कंपनीला छत्तीसगडमध्ये कोल ब्लॉक्स मिळालेत.
कोळसाकांडात दर्डा परिवारावर भाजप नेते किरीट सोमय्यांनी गेले काही दिवस आरोपांची राळ उठवली होती. नागपूरचे उद्योजक मनोज जयस्वाल यांच्या कंपन्यांवरही सीबीआयचे छापे पडल्यानं कोळसामंत्री श्रीप्रकाश जयस्वालही अडचणीत आले. कारण जयस्वाल परिवाराशी मिळून कोळसामंत्र्यांनी करोडो रुपयांचा कमाई केल्याचा आरोप सोमय्यांनी केला होता. या छाप्यातून सीबीआयच्या हाती लागलेल्या माहितीवरून सत्य समोर येईल अशी अपेक्षा आहे.