www.24taas.com, मुंबई
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर मैदानाच्या पीजवरून थेट राजकीय मैदानात उतरला. त्यावेळी अनेकांच्या भुवया उंचावल्यात. कशाला राजकारणात जातोय, सचिन! अशा प्रतिक्रिया आल्यात. मात्र, सचिनने विदर्भातील शेतकऱ्यांसाठी काम करायचे ठरविले आहे. त्यासाठी सुरूवातीला ज्या गावात वीज नाही तेथे विजेची सुविधा देण्याचा संकल्प सोडला आहे.
सचिन तेंडुलकर क्रिकेटला प्राधान्य देतानाच सामाजिक बांधिलकीही जपली आहे. अपनालय या संस्थेच्या माध्यमातून अनेक मुलांना दत्तक घेतले आहे. त्यांच्या खर्च स्वखर्चातून उचललाय. आता खासदार झालेला सचिन आपला खासदार निधी कसा खर्च करायचा याचा विचार करतोय. आपल्या सामाजिक कामातून चोख उत्तर देण्यासाठी खासदार सचिन सज्ज झाला आहे. वीजेअभावी काळोखात बुडालेली विदर्भातील काही गावे सौरऊर्जेने उजळण्याचा संकल्प सचिनने ४०व्या वाढदिवशी सोडला आहे.
राज्यातील काही गावांत अद्यापही अंधार आहे. ही गोष्ट सचिनला गेल्या काही वर्षांपासून छळत होती. त्याच दरम्यान `श्नायडर इलेक्ट्रिक`ने सौर ऊर्जेवरील दिव्यांची कल्पना मांडली. ही कल्पना सचिनला आवडली. ही कल्पना प्रत्यक्षात राबविण्याचा संकल्प सोडलाय.
कंदिलाच्या आकाराचे दिवे दिवसभर ऊन्हात ठेवून चार्ज करायचे आणि रात्री प्रकाशासाठी वापरायचे, असा हा प्रयोग आहे. कसलाही गाजावाजा न करता नाशिक जिल्ह्यातील वेळुंजे गावात प्रायोगिक तत्वावर हे काम सुरू करण्यात आले आहे.
विदर्भातील गावांतही असेच काम करण्याचा मनोदय सचिनने बोलून दाखवलाय. ज्या गावात वीज नाही तिथे सचिन आपल्या निधीतून सोलर लॅम्प देणार आहे. खासदार निधीचा योग्य करण्याचे पहिले उत्तर सापडले आहे. पुढे आणखीही काम करायचे आहे. पण हे काम एकट्याने करता येण्यासारखे नाही. सर्वांच्या सक्रीय सहभागाची गरज आहे. ती मिळेल. याबाबत लवकरच आम्ही कृती आराखडा तयार करणार आहोत, असे सचिन सांगतो.