www.24taas.com, झी मीडिया, अकोला
सध्याचा काळ हा लग्नसमारंभाचा… अकोल्यातही एक आगळावेगळा लग्नसोहळा पार पडलाय...कारण या सोहळ्यात पहायला मिळाला तो माणुसकीचा गहिवर अन वंचित समाजघटकाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठीची धडपड.
अकोल्यातील सूर्योदय बालगृहातील `पूजा` आणि बुलडाणा जिल्ह्यातील मेहकरचा `भास्कर` विवाहबद्ध झालेयेत. आयुष्याची नवी सुरुवात करणारे हे दोघेही `एच. आय. व्ही. पोझीटीव्ह` आहेत. अकोल्यातील `जानोरकर मंगल कार्यालया`त हा लग्नसोहळा पार पडलाय. अकोल्यात राष्ट्रसंत भैय्यूजी महाराज प्रणीत `श्री. सद्गुरु दत्त धार्मिक आणि परमार्थिक ट्रस्ट` द्वारा `सूर्योदय बालगृह` चालविण्यात येतंय. या बालगृहात सध्या एड्सग्रस्त 55 मुला-मुलींचे वास्तव्य आहे. याच बालगृहात लहान असतांना `पूजा` दाखल झाली होतीय. `पूजा`चे लग्न करण्याच्या दृष्टीने `बालगृह` आणि अकोल्यातील सामाजिक जाणीव असलेल्यांनी पुढाकार घेतला. बुलडाणा जिल्ह्यातील मेहकरचा `भास्कर` हा वर `पूजा`साठी निवडण्यात आलाय. अन `एच. आय. व्ही. पोझीटीव्ह` असणाऱ्या या दोघांच्याही आयुष्यात एक नवी पहाट उजाडलीय. अशा प्रकारचा विदर्भातील हा पहिलाच `लग्नसोहळा` असल्याचे बोलले जातेय.
`पूजा`च्या लग्नासाठी अनेक `हात` वधूपित्याच्या भूमिकेत पुढे आलेत. अन यातूनच कुणी कपड्यांचा, कुणी सोने खरेदी, तर कुणी जेवणावळीचा खर्च उचलत जबाबदारी पार पाडली. एक नवीन `आयुष्य`जगायला मिळणार या भावनेने पूजा आणि भास्कर आनंदून गेले होते. अकोल्यातील हा `लग्नसोहळा` खऱ्या अर्थाने एका नव्या पर्वाची सुरुवात करणारा ठरणार आहे.