व्हिडिओ: `त्या` महिलेला टीसीनं ढकललं नव्हतंच!

जळगाव रेल्वे स्टेशनवर सकाळी घडलेल्या घटनेविषयी ‘सीसीटीव्ही’ फुटेजच्या माध्यमातून धक्कादायक खुलासा समोर आलाय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: May 29, 2014, 09:44 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, जळगाव
जळगाव रेल्वे स्टेशनवर सकाळी घडलेल्या घटनेविषयी ‘सीसीटीव्ही’ फुटेजच्या माध्यमातून धक्कादायक खुलासा समोर आलाय.
ज्या संपत साळुंखे या ‘टीसी’वर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा रेल्वे पोलिसांनी दाखल केलाय त्या टीसीकडून या महिलेला ढकलल्याचे कुठेही या फुटेजमध्ये दिसत नाही. पोलिसांनी या प्रकरणात हलगर्जीपणा या प्रकरणात केलेला दिसतोय. चार तास या घटनेचा गुन्हा दाखल करण्यास पोलिसांना लागले.
या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या महिलेचं नाव उज्ज्वला पंड्या असं आहे. टीसीनं या महिलेला रेल्वेतून ढकलून दिल्यानं हा अपघात घडल्याचं समजून टीसीला लोकांनी बेदम मारहाण केली होती.
विशेष म्हणजे रेल्वे पोलिसांच्या मदतीला अतिरिक्त पोलीस अधीक्षक एन. अंबिका, पोलीस उपअधिक्षक प्रशांत बच्छाव हे तिथे असतानाही या अधिकाऱ्यांना हे प्रकरण हाताळता आलेले दिसत नाही. जर स्टेशनवर सीसीटीव्ही होता तर त्याचं फूटेज पाहून मगच पोलिसांनी कारवाई करणे अपेक्षित होतं. मात्र, आता या सीसीटीव्ही फुटेजमुळे पोलिसच मोठ्या पेचात पडलेत. दरम्यान, आता हे प्रकरण भुसावळ पोलिसांकडे सोपवण्यात आलंय.

पाहा, नेमका कसा झाला हा अपघात...