नाशिकमध्ये पोलिसांचीच गुन्हेगारी

नाशिक शहरातील गुन्हेगारी संपुष्टात आल्याचा दावा करणाऱ्या पोलिसांसमोर टोळक्यांनी पुन्हा एकदा आव्हान उभं केलंय. शहरात हाणामाऱ्यांचे प्रकार सर्रास वाढलेत. गुन्हेगारांचा बंदोबस्त करण्याची पावलं उचलण्याआधीच पोलिसांमधली गुन्हेगारीही समोर आलीय.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Dec 19, 2012, 10:07 PM IST

www.24taas.com, नाशिक
नाशिक शहरातील गुन्हेगारी संपुष्टात आल्याचा दावा करणाऱ्या पोलिसांसमोर टोळक्यांनी पुन्हा एकदा आव्हान उभं केलंय. शहरात हाणामाऱ्यांचे प्रकार सर्रास वाढलेत. गुन्हेगारांचा बंदोबस्त करण्याची पावलं उचलण्याआधीच पोलिसांमधली गुन्हेगारीही समोर आलीय.
नाशिक शहरात गेल्या आठ पंधरा दिवसात गुन्हेगारीनं पुन्हा डोकं वर काढलंय. केटीएचएम महाविद्यालयाच्या आवारात तरुणांनी धुडगुस घालत तलवार, धारधार शास्त्रांचा वापर करत युवकावर प्राणघातक हल्ला केला होता. त्यानंतर महाविद्यालय प्रशासनानं तातडीनं विद्यर्थी आणि शिक्षकांना ओळखपत्र, गणवेशसक्ती करण्याचा निर्णय घेतलाय. ज्या प्राध्यापकांना ऑफपिरेड आहे त्यांची ‘ड्युटी’ महाविद्यालयाच्या आवारात गस्त घालण्यासाठी लावली जाते. सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या समोरच महाविद्यालय असूनही या घटनेमुळे महाविद्यालयात असुरक्षिततेची भावना आहे.
धक्कादायक बाब म्हणजे पोलिसांमध्येही गुन्हेगारी प्रवृत्ती दिसून येतेय. महाविद्यालयातल्या मारहाणीत पोलीस हवालदाराच्या मुलाचा समावेश असल्याचं समोर आलंय. पोलीस मुख्यालयातल्या अंबादास कुटे या उपनिरीक्षकाविरोधात त्याच्याच पत्नीने पंचवटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिलीय. त्यामुळे गुन्हेगारांना पोलिसी खाक्या दाखवण्याबरोबरच आपल्याच खात्यातल्या पोलिसांवर कारवाई करण्याची नामुष्की पोलिसांवर आलीय.

गुन्हेगारांचे आश्रयस्थान आहेत तिथ पर्यंत पोलिसांचे हात जात नसल्याची ओरड नागरिकांमधून होतेय.गुन्हेगारांचे अड्डे उध्वस्त करण्यासठी पोलिसांनी मोहीम राबवावी अशी मागणी होवू लागलीय.