www.24taas.com , झी मीडिया, जळगाव
घरकुळ घोटाळ्यासंदर्भात कारागृहात असलेले सुरेश जैन यांच्या खान्देश विकास आघाडीनं सर्वाधिक ३३ जागांवर विजय मिळवत जळगाव महापालिका निवडणुकीत सरशी मिळवलीय. सत्ता स्थापनेसाठी बहुमताचा आकडा ३६ असून राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
जळगाव महापालिकेसाठी काल झालेल्या मतदानानंतर आज सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणीला सुरवात झाली. महापालिकेसाठी काल ५५ टक्के मतदान झालं होतं. सुरेश जैन यांच्या अनुपस्थितीत ही निवडणूक झाली असली तरी त्यांच्या आघाडीनं सर्वाधिक जागा जिंकण्यात यश मिळविलं.
विधानसभेतील विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षानं १५ जागांवर विजय मिळविलाय. मनसेनं निवडणुकीत जोरदार मुसंडी मारत १२ जागा जिंकल्या. गुलाबराव देवकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसनं ११ जागा जिंकल्या आहेत. जनक्रांती पक्षाला दोन जागा तर अपक्षांना एक जागा जिंकण्यात यश आलंय.
सत्ता स्थापनेसाठी खान्देश विकास आघाडीला आणखी तीन जागांची आवश्यकता आहे. त्यामुळं मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे सध्या तरी किंगमेकरच्या भूमिकेत आहेत. मतमोजणीनंतर मनसे हा तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून समोर आला आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.