www.24taas.com, झी मीडिया, बीड
स्त्रियांच्या आयुष्यात संघर्ष असतोच... मग ती एखाद्या मल्टिनॅशनल कंपनीची सीईओ असो की गृहिणी... ही आहे एक कहाणी अशाच एका संघर्षाची.. एसटीची एक महिला कंडक्टर रोजच्या जगण्याची लढाई लढतेय... तिच्या लढयाला अद्याप यश आलेलं नाही... पण रोज धावणाऱ्या एसटीच्या चाकांवरचा तिचा लढा सुरुच आहे.
एक वर्षाचं मूल कडेवर.. हातात तिकीटाचं मशीन... गर्दीनं खचाखच भरलेली एस टी बस.. कधी मूल कडेवर तर कधी एखाद्या प्रवाशाच्या कडेवर.. अशी कसरत रोज पाहायला मिळते गेवराई आगाराच्या बसमध्ये.. शकीला अहमद तडवी या महिला बस वाहकाचा प्रवास गेल्या वर्षभरापासून असाच सुरू आहे. गेवराई आगारात कार्यरत असलेल्या शकीला गेल्या चार वर्षांपासून वाहक म्हणून काम करत आहेत. मागच्या जानेवारी महिन्यात त्यांनी एका गोंडस मुलाला जन्म दिला. मॅटर्निटी लिव्हनंतर त्यांनी एसटी अधिकाऱ्यांकडे बैठ्या कामाची मागणी केली. मात्र त्यांना बैठं काम देण्यास नकार देण्यात आला. त्यामुळं त्यांना रोज आपल्या या बाळाला घेऊन एसटीतून प्रवास करावा लागतोय.
बुधवारी सकाळी गेवराई निपाणी-जवळका या बसमध्ये किमान ८० प्रवाशी होते. वाहकाचं तोंड दिसणंही मुश्किल अशा परिस्थितीत शकिला यांचं काम अव्याहतपण सुरू होतं. अखेरीस आपल्या जागेवर खांबाला एक झोळी बांधून त्यात मुलाला ठेऊन त्यांनी काम सुरू केलं. शकीला यांना आठ दिवसांत न्याय मिळाला नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मनसेनं दिलाय.
एकीकडे महिलांना आरक्षण मिळावं यासाठी संसदेत प्रयत्न सुरू आहेत. मात्र एक महिला आपल्या बाळाला घेऊन धावत्या, खचाखच भरलेल्या एसटीतून प्रवास करते. कर्मचारी महिलेची आणि तिच्या बाळाची अशी फरफट करण्याचा अधिकार एसटीच्या अधिकाऱ्यांना कोणी दिला. अशा क्रूर अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का. शकीला तडवी आणि त्यांच्यासारख्या अनेक अज्ञात महिलांना न्याय मिळणार का? हाच प्रश्न उपस्थित होतोय.
पाहा व्हिडिओ
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.