www.24taas.com, नाशिक
नाशिक शहरात शेकडो कोटी रुपयांचे जमीन घोटाळे उघडकीस येत असतांनाच महापालिकेबरोबरच हजारो नागरिकांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आलाय. महापालिकेनं संपादित केलेली जमीन छोटे प्लॉट करून नागरिकांना विकून मूळ मालकांनी कोट्यवधींची माया गोळा केल्याचा स्थानिकांचा आरोप आहे.
भारतनगर परिसरातल्या शेकडो कुटुंबीयांवर स्वत:चं घर असूनही बेघर होण्याची टांगती तलवार आहे. वडाळा रोड परिसरातल्या भूखंडावर 15 ते 20 वर्षांपासून हे नागरिक राहताएत... नागरिकांनी पै पै जमवून मूळ मालकाकडून प्लॉट खरेदी करून झोपडीवजा घरं बांधली. जमीन मालकानं सर्व कायदेशीर बाबी पूर्ण केल्यामुळे नागरिक निश्चिंत होते.
मात्र अचानक काही दिवसांपूर्वी महापालिकेनं संबंधित जागा महापालिकेची असल्याचे फलक झळकावल्यामुळे इथल्या नागरिकांच्या पायाखालची वाळूच सरकलीए. 1989 मध्येच महापालिकेनं या भूखंडाचं संपादन केल्याचं माहितीच्या अधिकारात निदर्शनास आलंय.महापालिकेचा घरपट्टी, पाणीपट्टीच्या रुपानं महसूल बुडत असल्याचं स्थानिक नगरसेवकांचं म्हणणंय.