दादागिरीला कंटाळून पालिका आयुक्तांचा राजीनामा

सोलापूर महानगर पालिकेचे आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी तडकाफडकी आयुक्त पदाचा पदभार सोडलाय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: May 6, 2014, 11:52 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, सोलापूर
सोलापूर महानगर पालिकेचे आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी तडकाफडकी आयुक्त पदाचा पदभार सोडलाय. सत्तारुढ काँग्रेससह विरोधी नगरसेवकांच्या दादागिरीला कंटाळून आयुक्तांनी हे पाऊल उचललंय. त्यामुळे सोलापुरात नवा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.
सोलापुरातल्या अनधिकृत बांधकामाच्या विरोधात आयुक्त गुडेवारांनी जोरदार मोहिम उघडली होती. तसंच एलबीटीची वसुलीही काटेकोरपणे सुरु केली होती. या दोन मुद्द्यावर नगरसेवक आणि आयुक्तांचे संबंध ताणले गेले होते. त्यामुळेच आयुक्तांना टार्गेट करण्यात आल्याचं पत्रकार शिवाजी सुरवसे यांच्यासह अनेकांचं म्हणणं आहे. सोलापुरच्या आमदार प्रणिती शिंदेंनी या प्रकरणी गुडेवारांची भेट घेऊन समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण त्यांची शिष्टाई यशस्वी झाली नाही. आयुक्त आपल्या भूमिकेवर ठाम राहिले.
सोलापुरात नगरसेवकांनी केलेलेल्या या आंदोलानामुळे आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी पदभार सोडलाय. सोलापूर शहराला होणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या मुद्यावर महापालिकेत जोरदार गदारोळ झाला. सत्तारुढ काँग्रेसच्या 20 नगरसेवकांनी आयुक्तांच्या कार्यालयासमोरच ठिय्या आंदोलन सुरु केलं. आयुक्तांच्या राजीनाम्याच्या मागणीवर हे नगरसेवक ठाम होते.
दरम्यान, आयुक्तांच्या या राजीनाम्यामुळे सोलापूर शहरात एकच खळबळ उडालीय. यामुळे सोलापूरमध्ये ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आलं. बीएसपीच्या कार्यकर्त्यांनी रस्ता रोको केला तर भाजप सेना नगरसेवकांनी पालिकेत ठिय्या आंदोलन केलं आणि कामगारांनी तर काम बन आंदोलन सुरु केलंय.

व्हिडिओ पाहा -

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.