www.24taas.com, झी मीडिया, नाशिक
आदिवासी विभागाच्या आश्रमशाळांमध्ये विषबाधेने विद्यार्थ्याचा बळी जाण्याचे प्रकार याआधी घडले होते. आता असाच प्रकार समाजकल्याण विभागाच्या आश्रमशाळेतही घडलाय. नाशिक जिल्ह्याच्या सुरगाण्याच्या एका वसतीगृहातल्या पाचवीतल्या मुलीचा बळी गेलाय. त्यामुळे आता समाजकल्याण विभागाच्या शाळा आणि वसतीगृहांच्या कारभाराबाबत प्रश्नचिन्ह उभं राहीलंय.
दामिनी गावीत या पाचवीतल्या मुलीचा मृत्यू झाल आहे. ११ वर्षांची ही मुलगी नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा इथे शिकत होती. गुजरात सीमेवरील गाव दोडीपाडा इथली रहिवासी...अलंगुण येथील समता संस्थेच्या शाळेत ती शिकत होती. रात्री जेवण झाल्यानंतर ती झोपली तर सकाळी बेशुद्ध आढळली. घाईघाईने सुरगाण्याच्या रुग्णालयात तिला दाखल करण्यात आलं. परिस्थिती गंभीर असल्याने पालकांनाही बोलावण्यात आलं. पालकांनी शाळा आणि वसतिगृहाच्या गैरकारभारामुळे झालं असल्याचे आरोप केले आहेत.
जिल्हा रुग्णालयात हलविल्यानंतर तिला मृत घोषित करण्यात आलं. हा मृत्यू कसा झाला याबाबत शवविच्छेदन अहवालात स्पष्ट होऊ शकेल. सध्या याबाबत गुप्तता पाळण्यात येत असून व्हिसेरा काढण्यात आला आहे. वसतिगृहाच्या अधीक्षकांनी याबाबत संदिग्धता व्यक्त केली आहे.
आदिवासी विभागांच्या आश्रमशाळांमध्ये आतापर्यंत शेकडो मुलांचे मृत्यू झाल्याचं उघड झालं आहे. समाजकल्याण विभागाच्या शाळांबाबत शोधमोहीम राबवल्यास धक्कादायक परिस्थिती समोर येऊ शकते, गरज आहे ती समाजकल्याण विभागानेही आपली यंत्रणा तपासून पाहण्याची...
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.