www.24taas.com, पुणे
शरद पवार यांच्या राजकीय मुत्सद्देगिरीचा आणखी एक नमुना समोर आला आहे. आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर कारवाईची शक्यता असतानाच केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या दुष्काळग्रस्त भागाच्या दौऱ्याला निवडणूक आयोगानं ग्रीन सिग्नल दिला आहे.
शरद पवार यांनी त्यासाठी रितसर परवानगी मागितली होती अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी पुण्यात दिली. त्यामुळे काका-पुतण्यांदरम्यान अजित पवारांसंदर्भातल्या तक्रारीवर येत्या सोमवारी निवडणूक आयोग निर्णय देणार आहे. आचारसंहिता लागू झालेली असतांना पुण्यात उड्डाणपुलाचं भूमीपूजन केल्याच्या कारणावरून अजित पवार अडचणीत आले आहेत.
अजितदादांनी निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रार शिवसेनेनं निवडणूक आयोगाकडे केली होती. त्यावर निवडणूक आयोगानं पुण्याच्या आयुक्तांकडून अहवाल मागवला आहे. तसंच अजित पवारांचा खुलासाही आयोगाला प्राप्त झाला आहे. आता याबाबत सोमवारी निवडणूक आयोग निर्णय देणार आहे.