www.24taas.com, झी मीडिया, राळेगणसिद्धी
अण्णा हजारेंच्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी `आप`चे नेते अरविंद केजरीवाल ताप असल्याने राळेगणला येऊ शकले नाहीत... परंतु त्यांनी पाठवलेल्या अन्य तीन नेत्यांच्या वक्तव्यामुळे आणि उपस्थितीमुळे अण्णांचा `ताप` मात्र नक्की वाढलाय.
‘आप’ नेत्यांनी अण्णांची भेट घेऊन त्यांच्या उपस्थितीतच नव्या टीम अण्णा सदस्यांवर नाव न घेता टीकेचा भडीमार केला. अण्णांच्या आंदोलनात ‘सरकारी दलाल’ पत्रकार रूपाने सहभागी असल्याचा खळबळजनक आरोप कुमार विश्वास यांनी केला. त्यांचा रोख ‘तिसरी दुनिया’चे संपादक व अण्णांचे नवे सहकारी संतोष भारती यांच्यावर होता. या टीकेने ‘नवी टीम अण्णा’ अस्वस्थ झालीय. त्यातच ‘आप’चे नेते गोपाळ राय यांनी उपोषण सुरू करण्याचा पवित्रा घेतला, परंतु अण्णांनीच त्यांना उपोषणाला बसू नका, असं बजावलंय. या सगळ्या प्रकाराने नाराज झालेले अण्णांचे सहकारी विश्वंभर चौधरी यांनी राळेगण सोडल्याने उलट-सुलट चर्चा सुरू झालीय. उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी घडलेल्या या नाट्यमय घडामोडींमुळे राळेगणमधील वातावरण तापलंय.
दरम्यान, कुमार विश्वास यांनी केलेल्या आरोपाबाबत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना विचारणा केली असता, ‘माझे कसे उन्हानं पांढरे झाले नाहीत’ अशी प्रतिक्रिया अण्णांनी दिलीय. तसंच आपण ‘आप’चे नेते गोपाल राय यांना उपोषणाला बसू नका, असं सांगितल्याचंही अण्णांनी स्पष्ट केलंय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.