www.24taas.com, कराड
कराडमध्ये यशवंतरावांच्या समाधीस्थळी सकाळपासून सुरु केलेलं आत्मक्लेश उपोषण अजित पवार यांनी सोडलं. गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी ही माहिती दिली. विनोदनिर्मितीसाठी अजितदादांचं ते वक्तव्य होतं, कुणाला दुखावण्याचा हेतू नव्हता, विरोधकांनी आंदोलन मागं घ्यावं, असं आवाहन आर. आर. पाटील यांनी केलंय.
अजितदादांनी मीडियाला टाळत काढता पाय घेतला. आत्मक्लेश आंदोलन संपवताना मीडियाशी बोलणं टाळलं आणि पुन्हा एकदा थेट पत्रक काढून आपली भूमिका मांडली.
आर. आर. वगळता राष्ट्रवादीचे बडे नेते अजितदादांच्या उपोषणस्थळी फिरकलेच नाहीत. कामगारमंत्री हसन मुश्रीफ, रामराजे निंबाळकर, मदन बाफना, विनायक मेटे, निवेदीता माने ही नेतेमंडळी उपोषणस्थळी हजर होती. आर. आर. पाटील वगळता राष्ट्रवादीतली ज्येष्ठ नेते मंडळी पाठीशी उभी राहिलेली दिसत नाहीत. कराडमध्येही आज हेच चित्र दिसून आलं.
दुष्काळ आणि भारनियमन या ज्वलंत समस्येवर अजितदादांनी असभ्य भाषेत वक्तव्य केल्यानं राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. तीनदा माफी मागुनही विरोधक आक्रमक आहेत.