www.24taas.com, पुणे
अॅसि़डिटी झाली म्हणून तुम्ही हॉस्पिटलमध्ये दाखल झालात आणि तिथल्या डॉक्टरांनी तुमच्यावर थेट एन्जिओप्लास्टी केली तर... बसला ना धक्का! पुण्यातील तेजिंदरसिंग अहलुवालिया यांच्यावर हा प्रसंग गुदरलाय. इतकंच नाही तर एन्जिओप्लास्टीसाठी हॉस्पिटलनं त्यांच्या हातात तब्बल पावणे पाच लाखांचे बिल दिलंय. हा धक्कादायक प्रकार घडलाय थेरगाव इथल्या ‘आदित्य बिर्ला हॉस्पिटलमध्ये’…
तेजिंदरसिंग अहलुवालिया वय वर्ष... अवघं ३६... ४ जानेवारी रोजी त्यांच्यावर ‘आदित्य बिर्ला हॉस्पिटलमध्ये’ एन्जिओप्लास्टी करण्यात आलीय. मात्र, या ठिकाणी वय किंवा एन्जिओप्लास्टी महत्त्वाची नाही... तर, तेजिंदरसिंग यांच्यावर झालेले उपचारच मुळात चुकीचे झालेत. बिर्ला हॉस्पिटलनं फसवून आपल्यावर एन्जिओप्लास्टी केल्याचा आरोप त्यांनी केलाय. तेजिंदरसिंग यांच्या आरोपात तथ्यही आहे. कारण, एन.एम.वाडिया इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओलॉजिमध्ये त्यांनी ह्रदयाशी संबधित सर्व चाचण्या केल्या होत्या. त्याचे सर्व रिपोर्ट नॉर्मल आले होते. विशेष म्हणजे त्यांनी या चाचण्या केल्या होत्या २४ डिसेंबर रोजी... म्हणजे, बिर्ला हॉस्पिटलने एन्जिओप्लास्टी करण्याच्या फक्त १० दिवस आधी. त्यामुळं १० दिवसांत रक्त वाहिन्यांत गाठी तयार होऊ शकतात का? असा सवाल तेजिंदरसिंग यांनी केलाय. तसंच, एन्जिओग्राफी आणि एन्जिओप्लास्टी संबंधित रिपोर्टदेखील बिर्ला हॉस्पिटलनं त्यांना दिलेले नाहीत. त्यामुळं तर तेजिंदरसिंग यांच्या दाव्याला अधिकच बळकटी मिळतंय.
एन्जिओग्राफी आणि एन्जिओप्लास्टीचे रिपोर्ट दाखवल्यानंतरच बिल भरतो, अशी भूमिका घेणाऱ्या तेजिंदरसिंग यांना हॉस्पीटलच्या सुरक्षा रक्षकांनी मारहाणही केलीय. त्यामुळं त्यांच्या उजव्या दंडावर जखमदेखील झालीय. या मारहाणीची पोलिसांत तक्रार आणि सरकारी हॉस्पिटलमधून रिपोर्टदेखील त्यांनी घेतलाय. एवढा प्रकार होऊनही बिर्ला हॉस्पीटल काही झालंच नाही, अशा थाटात आहे. बिर्ला हॉस्पिटलनं केलेल्या या फसवणुकीविरोधात तेजिदरसिंग मेडिकल कौन्सिलकडे तक्रार करणार आहेत. तसंच कोर्टातही लढण्याचा त्यांनी निर्णय घेतलाय. या लढाईत त्यांना यश येईलही. मात्र, एन्जिओप्लास्टीच्या वेळी शरीरात बसवण्यात आलेल्या स्टेन्समुळे त्यांना आयुष्यभर औषधांवर अवलंबून राहणार आहे... त्याची भरपाई कोण करणार?