www.24taas.com, झी मीडिया, पुणे
सहल घोटाळा, संगणक घोटाळा, कंपास पेटी घोटाळा... पुणे महापालिकेच्या शिक्षण मंडळाच्या घोटाळ्यांची ही मालिका. आता या मालिकेत आणखी एका घोटाळ्याची भर पडलीय. विद्यार्थ्यांसाठीच्या बेंच खरेदीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात येतोय.
विद्यार्थ्यांसाठीचा २८३० रुपयांचा बेंच ५४०० रुपयांना...
१० हजारांचं कपाट २५ हजार रुपयांना..
१८०० रुपयांची खुर्ची ३६०० रुपयांना...
३ हजार रुपयांचं टेबल साडे पाच हजारांना
४५० रुपयांची प्लास्टिकची खुर्ची ६१० रुपयांना... लाखाचे बारा हजार करणारा हा व्यवहार केलाय पुणे महापालिकेच्या शिक्षण मंडळानं..... या व्यवहारात, महापालिकेच्या तिजोरीला थोडं थोडकं नाही तर, तब्बल ८० लाखांचं नुकसान झालंय.
फर्निचर असो किंवा संगणक, विद्यार्थ्यांचे गणवेश किंवा बूट... प्रत्येक गोष्टीच्या खरेदीसाठी राज्य सरकारनं दर ठरवून दिलेत. त्याच दराने खरेदी करणं बंधनकारक असताना, तब्बल दुप्पट दरानं खरेदी करण्यात आली आहे. आता हे प्रकरण उघड झालं. मग आता माध्यमांना उत्तरं कोण देणार? शिक्षण मंडळाचे अध्यक्ष की शिक्षण प्रमुख... त्यावरून अध्यक्षांची आणि शिक्षण प्रमुखांची भंबेरी उडाली... अखेर कामचलाऊ उत्तरं देत, या दोघांनी वेळ मारून नेली...
शिक्षण हक्क कायद्यात तरतूद असल्यानं, शिक्षणमंडळं बरखास्त करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. मात्र, हायकोर्टाने त्याला स्थगिती दिली. आता तर, राज्य सरकारच नवीन कायदा करून शिक्षण मंडळे कायम ठेवणार आहे. मात्र, सामान्य विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याएवजी, घोटाळ्यांनी गाजणारी शिक्षण मंडळे हवीत कशाला? असा प्रश्न सामान्य नागरिकांना विचारात आहेत...
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.