www.24taas.com, पुणे
पिंपरी चिंचवडमध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि शरद पवार असे तिघेही एकत्र येत आहेत. निमित्त आहे सायन्स पार्कच्या उद्घाटनाचं... 8 तारखेला हा कार्यक्रम होत आहे. या तीनही नेत्यांकडून पिंपरी-चिंचवडमधल्या नेत्यांच्या आणि नागरिकांच्या ब-याच अपेक्षा आहेत.
पिंपरी-चिंचवडमध्ये काँग्रेसची पुरती वाताहत झालीय. शहरात कधी काळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बरोबरीनं असलेल्या काँग्रेसला महापालिकेत अवघ्या १४ जागांवर समाधान मानावं लागलं. त्यामुळे वरिष्ठ नेत्यांनी पिंपरी चिंचवडकडे लक्ष द्यावं, अशी मागणी स्थानिक नेते करतात. त्याचबरोबर पृथ्वीराज चव्हाणांनी शहरातल्या अनधिकृत बांधकामाच्या प्रश्नावर लोकांना दिलासा देणारी घोषणा करावी अशीही स्थानिक नेत्यांची अपेक्षा आहे.
दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार शहरात येत असल्यानं शहरातल्या अनधिकृत बांधकामाच्या प्रश्नावर योग्य तोडगा निघेल अशी आशा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनाही आहे. पिंपरी-चिंचवड शहरात ब-याच कालावधीनंतर हे सर्व नेते एकत्र येत आहेत. आता हे नेते सर्वांच्या पदरी काय देतात, हे पहाणं महत्वाचं ठरणार आहे.