www.24taas.com, झी मीडिया, पुणे
फसवणुकीचा अजब आणि धक्कादायक प्रकार पुण्यात पुढे आलाय. पुण्याच्या अगदी जवळ बंगल्यांसाठी प्लॉट देतो, असं स्वप्न दाखवत, शेकडो पुणेकरांची फसवणूक करण्यात आलीय. सन सिटी या प्रोजेक्टमधून कशा प्रकारे फसवणुकीचा प्रकार झालाय.
आकर्षक महिती पुस्तकं... वृत्तपत्रातून देण्यात आलेल्या जाहिराती आणि काही दिवसांपूर्वी शहरभर लागलेली अशी मोठ-मोठाली होर्डींग्स... जाहिरातबाजी आणि आश्वासनांचा हा पाऊस होता तो पुण्याजवळच्या चऱ्होलीमधले जमिनीचे प्लॉट विकण्यासाठी... एच. टी. खांदवे असोसिएशननं ७२ एकरांच्या या भूखंडावरचे शेकडो प्लॉट विकले. जाहिरातींना भुलून पुणेकरांनी हे प्लॉट विकत घेतले. पण आता या प्रकरणात आपली फसवणूक झाल्याचा आरोप या खरेदीदारांनी केलाय. ज्या एच. टी. खांदवे असोसिअशनकडून हे प्लॉट खरेदी करण्यात आले, त्यांच्याच मालकीची जमीन अजून झालेली नाही. तर त्यांनी हे प्लॉट विकलेच कसे? असा प्रश्न या खरेदीदारांना पडलाय.
हे प्लॉट नॉन अॅग्रीकल्चर असल्याचं आश्वासन खांदवे यांनी दिलं होतं. प्रत्यक्षात मात्र, हे प्लॉट नॉन अॅग्रीकल्चर तर नाहीच उलट पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या विकास आराखड्यात ७२ एकरांचा हा संपूर्ण भूखंड ग्रीन झोनमध्ये आहे. त्यामुळे स्वतःचं घर किंवा बंगला तर सोडाच साधं पत्र्याचं शेडही या ठिकाणी उभारता येणार नाही.
या भूखंडावर टेकड्या होत्या. मात्र, छोटे-छोटे प्लॉट करताना संपूर्ण भूखंडाचं सपाटीकरण करण्यात आलं. त्यात या टेकड्या जमीनदोस्त करण्यात आल्या. हे करत असताना मोठ्या प्रमाणवर उत्खनन करण्यात आलं. मात्र, टेकड्या फोडताना आणि उत्खनन करताना, ना कोणती परवानगी घेण्यात आली, ना सरकारला रॉयल्टी भरण्यात आली. या अधिकृत उत्खाननावर आणि टेकडी फोडीवर आता हवेलीच्या तहसीलदारांनी कारवाईची बडगा उगारलाय.
आकर्षक जाहिराती म्हणा किंवा खांदवे यांची आश्वासनं म्हणा... याला बळी पडून शकडो लोकांनी पै-पै करून जमवलेला पैसा इथे गुंतवला. सध्या, मात्र त्यांच्या ह़ी गुंतवणूक माती मोल झाल्याचं चित्र आहे. आता ही सर्व मंडळी जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांकडे दाद मागण्याच्या तयारीत आहेत. त्यांना न्याय मिळणार का, ते पहावं लागेल.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.