www.24taas.com , झी मीडिया, कोल्हापूर
जम्मू-काश्मीरच्या पूंछ भागात पाकिस्तान सैन्यानं केलेल्या हल्ल्यात शहीद झालेले जवान कुंडलिक माने यांच्या पार्थिवावर त्यांच्या मूळ गावी पिंपळगाव खुर्द इथं लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कारापूर्वी माने यांना लष्करानं मानवंदना देवून अखेरचा निरोप दिला. यावेळी `कुंडलिक माने अमर रहे` अशा घोषणा देत उपस्थितांनी साश्रूनयनांनी आपल्या वीर सुपुत्राला निरोप दिला.
कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागल तालुक्यातील पिंपळगाव बुद्रुक इथले रहिवासी असलेल्या मानेंच्या मृत्यूनं संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यावरच शोककळा पसरलीय. अंत्यसंस्काराला राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील, भाजप नेते गोपीनाथ मुंडे, कोल्हापूरचे पालकमंत्री हर्षवर्धन पाटील, कामगार मंत्री हसन मुश्रीफ, गृहराज्य मंत्री सतेज पाटील यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.
वीरपुत्र कुंडलिक माने यांच्या कुटुंबियांच्या नावे पाच लाख रुपयांची ठेव देणार, अशी घोषणा कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. तर आपलं एक महिन्याचं वेतन देण्याची घोषणा कोल्हापूर जिल्ह्यातल्या सर्व आमदारांनी केली.
सोमवारी रात्री पूंछमधील प्रत्यक्ष सीमारेषेजवळ पाकिस्तानी सैन्यानं भारतीय लष्कराच्या गस्त पथकावर केलेल्या या क्रूर हल्ल्यात माने यांच्यासह नायक प्रेमनाथ, लान्सनायक शंभू सरन, शिपाई विजयकुमार राय आणि शिपाई रघुनंदन प्रसाद हे अन्य चार जवानही शहीद झाले होते.
दरम्यान, या नापाक हल्ल्याचा सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येतोय. मात्र भारत सरकारपर्यंत शहिदांच्या कुटुंबियांचा आक्रोश पोहचणार आहे का? भारत पाकला आता तरी धडा शिकवणार का असा सवाल सर्वत्र उपस्थित होत आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.