www.24taas.com, पुणे
राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याप्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या मॉडेल गेहना वशिष्ठ हिला जामीनावर सोडण्यात आलं. पुणे पोलिसांनी शनिवारी रात्री तिला ताब्यात घेतलं होतं. तिला आज न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. प्रसिद्धीसाठी वाट्टेल ते करण्यास तयार असणा-या अनेक मॉडेलपैकी एक म्हणजे गेहना वशिष्ठ. मात्र हे वाट्टेल ते करणं तिच्या चांगलंच अंगलट आलंय.
देशाचा राष्ट्रध्वज परिधान करुन फोटोशूट करणा-या गेहना वशिष्ठविरोधात लोकजनशक्ती पक्षाच्या रवींद्र ब्रम्हे यांनी तक्रार दाखल केल्यानंतर पुण्याच्या डेक्कन पोलीस स्थानकांत गुन्हा दाखल झाला होता. त्यानुसार पुणे पोलिसांनी शनिवारी रात्री तिला मुंबईतून ताब्यात घेतलं. गेहनाला न्यायालयात हजर केलं असता तिची पाच हजारांच्या जामिनावार मुक्तता करण्यात आली.
या निर्णयाला आव्हान देणार असल्याचं तक्रारकर्ते ब्रम्हे यांनी सांगितलं. प्रसिद्धीसाठी अनेक मॉडेल कोणताही मार्ग अवलंबताना दिसतात. परंतु गेहन वशिष्ठनं सर्वांवर कडी करत चक्क तिरंग्याचाच अपमान केला. त्यामुळं तिला संतप्त जमावाकडून मारहाणही झाली होती. आता तरी ती सुधारेल आणि या घटनेतून इतर मॉडेल काहीतरी शिकतील. अशी अपेक्षा बाळगायला हरकत नाही.