www.24taas.com, झी मीडिया, पुणे
आयआयटी कानपूरचे माजी संचालक आणि केंद्रीय वैज्ञानिक सल्लागार परिषदेचे सदस्य संजय धांडे यांची इंटरनेट बँकिंगद्वारं १९ लाखांची फसवणूक झाल्याचं उघडकीस आलंय. विशेष म्हणजे पैसे काढण्याचा `एसएमएस` मोबाईलवर जाऊ नये म्हणून चोरट्यांनी अगोदरच धांडे यांचं सीमकार्ड बंद केल्याचंही कळतंय. याप्रकरणी चतु:श्रुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाषाण इथं राहणारे ५८ वर्षीय संजय धांडे हे आयआयटी कानपूरचे माजी संचालक आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धांडे यांचं औंध रस्त्यावरच्या आयसीआयसीआय बँकेत खातं आहे. या खात्यात १९ लाख दहा हजार रुपये होते. गेल्या सोमवारी धांडे यांना बँकेतून दूरध्वनी आला. बँकेच्या खात्यावरील रक्कम दहा हजार रुपयांच्या खाली आली असून, ती रक्कम भरावी, असं त्यांना सांगण्यात आलं. तेव्हा धांडे यांना आपल्या खात्यातून पैशांची चोरी झाल्याचा प्रकार कळला.
चोरट्यांनी बँकेचा सर्व्हर हॅक करून त्यांच्या खात्यावरील १९ लाख एक हजार रुपये काढून घेतले. धांडे यांची मोबाईल बँकींग सुविधा सुरू असल्यामुळं बँकेतून पैसे काढल्यानंतर त्याचा संदेश मोबाईलवर येतो. पैसे काढल्याचा धांडे यांना एसएमएस जाऊ नये म्हणून चोरट्यांनी काही दिवस अगोदरच त्यांच्या मोबाईलचं सीमकार्ड बंद केलं होतं. त्याबाबत धांडे यांनी चौकशीही केली होती.
पण, बँकेकडून त्यांना फोन आल्यानंतरच हा प्रकार लक्षात आला. त्यांनी याबाबत चतु:श्रुंगी पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर अज्ञात व्यक्तींच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास सायबर शाखेकडं सोपविण्यात आला आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.