www.24taas.com, झी मीडिया, पिंपरी-चिंचवड
पिंपरी चिंचवडमध्ये राजकीय वातावरण तापायला लागलंय. राष्ट्रवादी काँग्रेस स्वत:ला ताकदवान म्हणतंय. पण त्यांच्याकडे माझ्या विरोधात साधा उमेदवारही नाही, अश्या शब्दात शिरूरचे खासदार आणि शिवसेना नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादीला डिवचलंय. तर राष्ट्रवादीनं ही शिरूर यावेळी आमचीच राहणार, असं सांगत राजकीय वातावरण तापवलंय.
शिरूर लोकसभा मतदार संघात पिंपरी-चिंचवड शहराचा बऱ्यापैकी भाग येत असला राष्ट्रवादी काँग्रेसला इथं दारुण पराभव स्वीकारावा लागला होता. शिवसेनेच्या शिवाजीराव आढळराव पाटील यांनी विलास लांडे यांना दोन लाखांहून अधिक मतांनी धूळ चारली होती. हा पराभव राष्ट्रवादीच्या जिव्हारी लागला. त्यामुळं आता राष्ट्रवादी काँग्रेसनं नवी रणनिती आखायला सुरुवात केलीय.
त्याचाच एक भाग म्हणून शिवसेनेचे आढळराव पाटील राष्ट्रवादीत येणार आणि तेच शिरूरचे उमेदवार असणार अशी चर्चा पद्धतशीरपणे सुरु करण्यात आलीय. पण शिवाजीराव पाटील यांनी या चर्चेला उत्तर दिलंय. उलट राष्ट्रवादी काँग्रेसकडे साधा उमेदवारही नाही अश्या शब्दात त्यांनी राष्ट्रवादीला डिवचलंय.
राष्ट्रवादी काँग्रेसनं ही पाटलांना जोरदार प्रत्युत्तर देत, आमच्याकडे भरपूर उमेदवार आहेत, यावेळी आम्ही शिरूर जिंकूच असा दावाही त्यांनी केलाय.
राष्ट्रवादी काँग्रेसची शिरूरमध्ये ताकद आहे, पण लोकसभेच्या लढतीत मात्र त्यांचा पराभव होतो. हेच चित्र त्यांना बदलायचंय. पण त्यांच्याकडे महेश लांडगे आणि विलास लांडे यांच्या शिवाय कोणतंच नाव पुढं येत नाही. दुसरीकडे शिवसेनेकडे मात्र शिवाजीराव पाटलांच्या रुपानं एक तगडा उमेदवार आहे. त्यामुळंच हा सामना आतापासून रंगतदार अवस्थेत आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.