www.24taas.com, झी मीडिया, सोलापूर
महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था बिघडली असतानाचं तंटामुक्त योजनेलाही राज्यात हरताळ फासला जातोय. तंटामुक्त गावाला दिल्या जाणाऱ्या बक्षिसांमुळेच गावातल्या शांततेचा भंग होतोय.
गावागावातले तंटे मिटावेत यासाठी गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी तंटामुक्ती अभियान सुरु झालंय. मात्र सोलापूर जिल्ह्यात याच योजनेमुळं तंटा निर्माण झालाय. सांगोला तालुक्यातलं आलेगाव हे याच ठळक उदाहरण. संवेदनशील असलेल्या या गावात अनेक गुन्हे असताना ही भांडणं कागदोपत्री मिटल्याचे दाखवण्यात आले. त्यामधून 2011 आणि 12 मध्ये गावाला पहिल्या क्रमांकाचे तंटामुक्त गाव म्हणून पारितोषिक मिळाले. यातली आणखी धक्कादायक बाब म्हणजे सहा लाखाचे बक्षीस मिळाल्याने कागदोपत्री तंटामुक्त झालेले गाव जास्त तंटेखोर झालय. टार्गेट पूर्ण करण्यासाठी तंटे मिटल्याची खोटी कागदपत्रे तयार केल्याची कबुली तंटामुक्त समितीच्या सदस्यानी दिलीय .
ही सारी फसवणूक इथंच थांबत नाही. 2013-14 या वर्षाचा तंटामुक्त समितीचा अध्यक्ष निवडण्यासाठी गावात दोन गट पडलेत. या गटात हाणामारी होवू नये यासाठी पोलिसांनीही हस्तक्षेप केला. तरीही हे प्रकरण मिटलेलं नाही. या गावाची यावर्षीची ग्रामसभाही या गोंधळामुळे दोनदा तहकूब करावी लागली.
तंटामुक्त योजना प्रभावीपणे राबविण्याचा हा खटाटोप म्हणजे गृहखात्याच्या डोळ्यात सरळ सरळ धूळफेक आहे. गृहमंत्री आर.आर. पाटील यांच्या लाडक्या योजनेलाच अशाप्रकारे हरताळ फासला जातोय. अडचणींच्या चक्रव्युहात अडकलेले आर.आर. आबांना याकडे बघण्यास कधी वेळ मिळणार हा प्रश्न कायम आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.