www.24taas.com, झी मीडिया, कोल्हापूर
कोल्हापूर जिल्ह्यातल्या अतिग्रे गावामध्ये तळ्यातला गाळ काढताना एका प्राचीन मंदिराचे अवशेष सापडले आहेत. तळ्याच्या मध्यभागी असलेलं मंदिर शेष नारायणाचं असल्याचा दावा अभ्यासकांनी केलाय. त्यामुळे ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात खोदकाम सुरू करुन मंदिर खुलं करण्याचा प्रयत्न सुरु केलाय.
कोल्हापूर - सांगली रस्त्यावरच्या अतिग्रे गावाची तहान भागवणारा शाहू तलाव कधीच आटला नव्हता अशी आठवण या गावातले जुणे जाणकार सांगतात. तळ्याच्या मध्यभागी एक मंदिर असल्याच्या दंतकथा पिढ्यानपिढ्या ऐकवल्या जात होत्या. मात्र आता या तळ्याच्या मध्यभागी खरंच मंदिर असल्याचे अवशेष मिळालेत. गेल्या वर्षी पाऊस कमी झाल्यामुळे तळ्यातल्या पाण्यानं तळ गाठला होता. तळ्यात गाळही खूप साठला होता. त्यामुळं ग्रामस्थांनी तळ्यातला गाळ आणि माती काढण्याची रीतसर परवानगी घेऊन काम सुरु केलं. काही अंतर खोदकाम झाल्यानंतर तळ्याच्या अगदी मध्यभागी दगडी बांधकाम असल्याचे लक्षात आलं. पण पूर्ण उत्खनानंतर त्या ठिकाणी पाण्याची विहीर असल्याचं आढळून आलय. मात्र विहीरीच्या पूर्वेला उत्खनन करताना मंदिरासारख्या भागाचे आवशेष सापडलेत. खोदकामात मंदिरासारखा भाग सापडला असून मंदिरावर पुजेचं साहित्य आणि शिवलिंग आढळून आलय. त्याचबरोबर काही दगडावर नागाच्या प्रतिमाही आढळून आल्यात. त्यामुळं तेराव्या शतकातल्या ग्रंथांच्या संदर्भानुसार हे शेष नारायणाचं मंदिर असावं असा दावा अभ्यासकांनी केलाय.
गावक-यांनी उत्खननात आढळणा-या सर्व वास्तूची माहिती जिल्हा प्रशासनाबरोबर पुरातत्व खात्याला दिलीय. मात्र त्याची म्हणावी तशी दखल कुणीही घेतली नसल्याचं गावक-यांनी म्हटलंय. तलाव परिसरात व्यवस्थित उत्खनन झाल्यास मंदिराबाबतच्या अनेक दंतकथांचा उलगडा होणार आहे.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.