www.24taas.com, पुणे
येरवडा जेलमध्ये शिक्षा भोगत असलेला गुंड शरद मोहोळ निवडणुकीच्या रिंगणात उतरलाय. पुण्याजवळच्या मुळशी तालुक्यातल्या मुठा गावातून शरद मोहोळ उपरसरपंचपदाची निवडणूक लढवणार आहे.
काही दिवसांपूर्वीच येरवडा जेलमध्ये इंडियन मुझाहिद्दीनचा दहशतवादी कातिल सिद्दीकीची जेलमध्येच हत्या केल्याचा आरोप शरद मोहोळवर आहे. सिद्धीकीची जेलमध्ये गळा आवळून हत्या केल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली होती. त्यामुळे पुन्हा एकदा शरद मोहोळ चर्चेत आला होता.
काय आहे शरद मोहोळची पार्श्वभूमी
पुण्यामध्ये मारणे आणि मोहोळ या गुंडांमध्ये नेहमीच टोळीयुद्ध व्हायचे. या टोळी युद्धातूनच २००६ मध्ये मारणे गटाने मोहोळ टोळीचा प्रमुख संदीप मोहोळचा खून केला. संदीप मोहोळच्या मृत्यूनंतर त्याचा उत्तराधिकारी म्हणून शरद मोहोळने टोळीची जबाबदारी स्वीकारली. त्याने २०१० मध्ये किशोर मारणेचा खून केला. तसेच नोव्हेंबर २०११ मध्ये दासवे गावचे सरपंच शंकरराव धिंडले यांचे अपहरण करून ४५ लाख रूपये खंडणी घेतली होती. याप्रकरणी खंडणी विरोधी पथकाने मोहोळ आणि भालेराव यांना अटक केली होती. मोहोळवर खून, दरोडा, जबरी चोरी, अपहरण यासारखे गंभीर स्वरुपाचे आठ गुन्हे दाखल आहेत.