अजितदादा- अशोक चव्हाण बॅक बेंचर्स

सिंचन घोटाळ्याच्या आरोपामुळे अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Dec 5, 2012, 08:27 PM IST

मागच्या बाकावर बसण्याची ओढावणार नामुष्की
www.24taas.com,नागपूर
सिंचन घोटाळ्याच्या आरोपामुळे अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. या पार्श्वजभूमीवर सहा दिवसांच्या तोंडावर आलेल्या हिवाळी अधिवेशनात अजित पवार यांची अधिवेशनात बसायची जागा कुठे असेल? अशी चर्चा सुरू झाली आहे.
मंत्रिमंडळातील पवारांच्या पुनरागमनाचा विषय लांबणीवर पडल्याने अधिवेशनात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या शेजारी बसण्याची वेळ त्यांच्यावर येणार आहे आणि हे राजशिष्टाचारानुसार असेल अशी माहिती सूत्रांनी दिली.
गेल्या काही वर्षांपासून सत्ताधारी आघाडीच्या अनेक मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत, मात्र यातील आरोपांची शहानिशा करण्यासाठी आघाडी सरकारने अजिबात पुढाकार घेतल्याचे दिसलेले नाही. अशोक चव्हाण यांनाही मुख्यमंत्रिपद गमवावे लागले ते दिल्लीवरून हायकमांडने आदेश दिल्याने. राष्ट्रवादी काँग्रेसने तेवढेही केलेले नाही.
अजित पवार यांच्यासह जलसंपदामंत्री सुनील तटकरे, सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ, उच्च वैद्यकीय शिक्षण मंत्री विजयकुमार गावीत तसेच परिवहन राज्यमंत्री गुलाबराव देवकर या सर्व राष्ट्रवादी मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत.
या सर्व पार्श्वेभूमीवर अजित पवार यांच्या रूपात राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी राजीनामा दिल्याने अधिवेशनात प्रथमच त्यांना मागच्या बाकावर बसण्याची वेळ आली आहे. दोन वर्षांपूर्वी ‘आदर्श’ इमारत घोटाळा प्रकरणात मुख्यमंत्रीपदाची खूर्ची गमवावी लागल्याने अशोक चव्हाण यांना आमदारांच्या रांगेत मागे बसावे लागले. ज्या सदनाचे नेतृत्व केले त्याच सदनात मागच्या बाकावर बसावे लागण्याची नामुष्की म्हणजे एकप्रकारे राजकीय विजनवास असल्याचे बोलले जाते. या नामुष्कीमुळे अशोक चव्हाण गेल्या दोन वर्षांत बर्यांअचदा विधिमंडळात अनुपस्थित राहिलेले दिसले. आता अजित पवारांची काय भूमिका असेल? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.