www.24taas.com, झी मीडिया, सोलापूर
कोट्यवधी वारकऱ्यांचं श्रद्धास्थान असणाऱ्या पंढरपूरच्या विठ्ठलाची कार्तिकी एकादशीला शासकीय महापूजा करू न देण्याचा इशारा वारकरी संघटना आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं दिलाय.
सोलापूर जिल्ह्यातल्या डाव्या आणि उजव्या कालव्यातनं दुष्काळग्रस्त सोलापूर जिल्ह्यातल्या काही भागाला पाणी मिळावं, यासाठी जनहित शेतकरी संघटनेचे भय्यासाहेब देशमुख दीड महिना आझाद मैदानावर उपोषणाला बसले होते. त्या आंदोलनावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘उजनीत पाणी नाही तर मुतायचे काय?’ असं म्हणत असभ्य भाषेत टिप्पणी केली होती. त्यांच्या त्या वक्तव्याचा राग वारकऱ्यांमध्ये कायम आहे. त्यामुळेच अजितदादांना पुजेसाठी संघटनेनं विरोध दर्शवलाय. उजनी धरण हे पंढरपूर येथे येणाऱ्या भीमा नदीवर बांधलेलं आहे. या नदीत करोडो वारकरी स्नान करून आपल्या लाडक्या विठूरायाचं दर्शन घेतात. त्या नदीचं पाणी वारकरी हे तीर्थ म्हणून पितात आणि गावाकडे नेतात. त्यामुळे त्यांना अजितदादांचं वक्तव्य न रुचणं साहजिकच आहे.
तसंच गोवंश हत्याबंदी विधेयक लागू का केला नाही? यासंदर्भातही वारकरी संघटना मार्गदर्शक तसंच व्यसनमुक्ती संघटनेचे संस्थापक बंडा तात्या कराडकर यांनी राग व्यक्त केलाय. आगामी हिवाळी अधिवेशनादरम्यान हे विधेयक लागू करावं अन्यथा सरकारला मतदान करू नये, असं आवाहन हिंदूंना करण्यात येणार असल्याची माहितीही या वारकऱ्यांनी दिलीय.
महापूजेच्या आधी म्हणजे दशमीला रात्री १२ वाजल्यापासून शिवाजी चौकात मोठ्या संख्येनंने वारकरी जमतील व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आढवतील त्याच्या महापूजेसाठी प्रसासनाने बळाचा वापर केला तरी आम्ही माघारी हटणार नाही, असा निर्णय वारकऱ्यांनी घेतल्याचे बंडा तात्या कराडकर यांनी जाहीर केलंय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.