मुंब्र्यातील बिल्डर परप्रांतीय होता – राज

मुंब्र्यात जी इमारत पडली, ती बांधणारा हा परप्रांतीय होता. तर मृत्यूमुखी पडलेल्यांपैकी १०० टक्के हे उत्तरप्रदेशचे आहेत, अशी पोलिसांची माहिती असल्याचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जळगाव येथील सभेत मुद्दा उपस्थित करून पुन्हा परप्रांतीयांवर हल्लाबोल केला आहे.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Apr 8, 2013, 08:19 AM IST

www.24taas.com, जळगाव
मुंब्र्यात जी इमारत पडली, ती बांधणारा हा परप्रांतीय होता. तर मृत्यूमुखी पडलेल्यांपैकी १०० टक्के हे उत्तरप्रदेशचे आहेत, अशी पोलिसांची माहिती असल्याचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जळगाव येथील सभेत मुद्दा उपस्थित करून पुन्हा परप्रांतीयांवर हल्लाबोल केला आहे.
जमील कुरेशी हा राहणारा कुठला तर सिद्धार्थनगर, जिल्हा गोरखपूर, उत्तर प्रदेशचा. याचा मूळचा व्यवसाय काय भंगाचा.... आणि मुंबईत काम काय तर खोट्या अनधिकृत इमारती तयार करायच्या आणि त्यात उत्तर प्रदेशमधील लोकं घुसवायचे. एक मजला झाला की उत्तर प्रदेशमधील माणसं घुसवायची. दुसरा झाला की अजून घुसवायची.... मग यातील फ्लॅट विकले गेले की घुसवलेली माणसे इतर ठिकाणी इमारती बांधायच्या आणि तेथे घुसवायची, हेच धंदे करायचा....
मुंब्र्यात इमारत कोसळून ७४ जण ठार तर ६० जण जखमी झाले. तर ही अनधिकृत इमारत बांधणार जमील कुरेशी हा उत्तर प्रदेशचा आहे. त्याला उत्तरप्रदेशातील सिद्धार्थनगर येथे अटक करण्यात आली. तो पळून गेला तो उत्तर प्रदेशात. या माहितीवर राज ठाकरे यांनी विशेष जोर दिला. आज जरी राज्यकर्ते जरी बेसावध असले, तरी तुम्ही सावध राहा, असा सल्लाही राज ठाकरे यांनी यावेळी दिला.
मराठा आरक्षणाला राज ठाकरेंचा विरोध
मराठा आरक्षणाला राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा विरोध केला आहे. जातीमध्ये विभागणी करून राज्यकर्ते मराठी माणसाची माथी भडकवत असल्याचा आरोप राज ठाकरेंनी केला. महाराष्ट्रातल्या मराठी माणसांचीच नव्हे, तर महापुरूषांचीही या लोकांनी विभागणी केल्याचं राज ठाकरेंनी दाखवून दिलं.
निवडणुकीमध्ये मत मिळवण्यासाठी राज्यकर्त्यांकडे असणारं हत्यार म्हणजे आरक्षण असल्याचं राज ठाकरेंनी जळगावात म्हटलं. मतांसाठी जाती जातींमध्ये तेढ निर्माण करून मराठी माणसाला एकमेकांची माथी फोडायला लावतात. महाराष्ट्रातील संपूर्ण जनतेने मराठी म्हणून एकत्र येऊ नये, यासाठीच आरक्षणाच्या रूपाने जातीयवाद केला जात असल्याचं राज ठाकरे म्हणाले. मराठा आरक्षणासाठी सर्वपक्षीय नेते एकत्र आले, पण महाराष्ट्रातल्या इतर प्रश्नांसाठी सर्वपक्षीय नेते असे एकत्र का येत नाहीत, असा सवाल, राज ठाकरेंनी केला. दुष्काळ, महिला सुरक्षा यांसारख्या महाराष्ट्रातील प्रश्नांवर एकत्र न येणारे सर्वपक्षीय नेते आरक्षणाच्या मुद्यावर एकत्र येऊन समाजाची जातींमध्ये विभागणी करत असल्याचं राज ठाकरेंनी म्हटलं.
केवळ मराठी माणसाचीच नव्हे, तर महापुरषांचीही यांनी जातीत विभागणी केल्याचं राज ठाकरेंनी दाखवून दिलं. छत्रपती शिवाजी महाराज मराठा समाजाचे, महात्मा फुले माळी समाजाचे, डॉ. आंबेडकर दलित समाजाचे, लोकमान्य टिळक ब्राह्मण समाजाचे अशी महापुरुषांचीही विभागणी केली गेल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं. संपूर्ण महाराष्ट्राचा प्रश्न एक असता फरक का करता, असा सवाल राज ठाकरेंनी केला.

अजित पवारांना सत्ता आणि पैशाचा माज आलाय – राज
जळगावात भाषणात राज ठाकरेंनी महाराष्ट्रातल्या विविध प्रश्नांवर आपली भूमिका मांडली. यावेळीही राष्ट्रवादी नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना राज ठाकरेंनी टार्गेट केलं. इंदापूरच्या भाषणात अजित पवारांनी कमरेखालच्या भाषेत केलेल्या वक्तव्यांचा राज ठाकरेंनी आज खरपूस समाचार घेतला.
“अजित पवारांचं वक्तव्य हे महाराष्ट्रातल्या दुष्काळग्रस्त जनतेची थट्टा आहे. धरणांमध्ये पाणी नाही, तर मी काय त्यात जाऊन मुतू का असं अजित पवार म्हणाले. अजित पवार तुम्हाला निवडणुकीत आता मत नाही मूत मिळणार आहे. महाराष्ट्राची जनता तुमच्यावर मुतणार आहे. त्यात तुम्ही वाहात महाराष्ट्राबाहेर जाल. आणि तुम्हाला थांबवायला बंधारेही नाहीत. तेव्हा तुमच्या लक्षात येईल, की धरणं किंवा बंधारे बांधले असते, तर वाहात एवढं दूर आलो नसतो.” असं आपल्या शैलीत राज ठाकरे म्हणाले.
लोडशेडिंगमुळे महाराष्ट्रात मुलं जास्त पैदा होत आहेत, या अजित दादांच्या वक्तव्यावरही राज ठाकरेंनी टीका करताना म्हटलं की ‘तुझ्याकडे तर लोडशेडिंगशिवाय चालू आहे ना!’...अजित पवारांना सत्ता आणि पैशाचा माज आला आहे, अशी टीका राज ठाकरेंनी अजित पवारांवर केली.