www.24taas.com, मोहाली
महाराष्ट्रामध्ये जरा फिरा, महाराष्ट्र खूप मोठा आहे. मनोरंजनासाठी खूप गोष्टी आहेत, असा अप्रत्यक्ष टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना लगावला आहे.
राज ठाकरे यांनी फेब्रुवारी मार्च महिन्यात राज्यात विविध ठिकाणी दौरा आयोजित केला. या दौऱ्यावर अप्रत्यक्ष टीका करताना उद्धव ठाकरे यांनी टोला लगावला आहे. राज ठाकरेने आरोप करावीत आणि आम्ही उत्तरं द्यावी, हे आमच्या समोर उद्दिष्ठ नसून काँग्रेस राष्ट्रवादीचे सरकार घालवणं, हे आमच्या समोरच मुख्य उद्दिष्ठ आहे. महाराष्ट्रात जरा फिरा, महाराष्ट्र खूप मोठा आहे. महाराष्ट्रातील इतर प्रश्नावर आपण बोललो तर महाराष्ट्रातील जनतेला जास्त भावेल, असा सणसणीत टोला उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना लगावला आहे.
सभागृहात सेना-भाजप एकत्र आहेत, आता रस्त्यावरही आम्ही या प्रश्नावर एकत्र येऊ असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. गेले वर्ष आमच्यासाठी आघाताचं वर्ष होतं. तो आघात खूप मोठा होता. या आघातातून सावरून आम्ही आता जनतेसाठी आणि जनतेबरोबर राहून लढणार आहोत, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.
चाळीस वर्षांनी पक्ष मोठा होतो, की चार सभांनी पक्ष मोठा होतो या पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उद्धव म्हणाले, पत्रकारांनीच याचं उत्तर दिलं पाहिजे. कारण पत्रकारही महाराष्ट्रातले आहेत. मुळात विश्वासार्हता हा खूप मोठा प्रश्न आहे. विश्वासार्हता असेल तर तो माणूस खूप मोठा होतो आणि तो पक्षही मोठा होतो. शिवसेनाप्रमुखांची आणि भाजपची विश्वासार्हता आहे ती खूप मोठी आहे.