www.24taas.com, नागपूर
जगातील भल्या भल्या बॉलरला इंगा दाखवणारा ‘मास्टर ब्लास्टर’ सचिन तेंडुलकरला सध्या अपयशाचा सामना करावा लागत आहे. सातत्याने येणारे अपयश यामुळे मास्टरवर टीका होत आहे. त्याला निवृत्तीचा सल्ला देण्यात येत आहे. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील ७६ धावांची एक मात्र खेळी वगळता सचिनची बॅट म्यान झाली आहे. सचिनच्या निवृत्तीची चर्चा ‘जोरात’ असून पत्नी नागपुरात दाखल झाल्यामुळे या चर्चेला उधाण आलंय.
२ जानेवारी २०११ रोजी केपटाऊन कसोटीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १४६ धावांची शतकी खेळी ‘मास्टर ब्लास्टर’ने केल्यावर गेल्या २३ महिन्यांत त्याला शतक झळकवता आलेले नाहीय. गेल्या १७ डावांत त्याच्या बॅटीतून (३४, १६, १, २३, ०७, ३८, ९४, ७३, ४१, १५, २५, १९, १७, १३, ८, ७६ व नागपूरच्या पहिल्या डावांत २) फक्त २८च्या सरासरीने ५०२ धावा काढल्यात.
विश्वाविक्रम आणि धावांचे डोंगर पाहता सचिनला निवृत्तीचा सल्ला देणारे आपण कोण, अशी भावना सामान्य माणसापासून विवियन रिचर्डस्सारख्या महान फलंदाजाने व्यक्त केली आहे. दरम्यान, गेल्या १६ डावांबरोबर नागपुरात पुन्हा सचिन २ धावांवर त्रिफळाचीत झाल्यामुळे त्यांच्या विक्रमी कारकीर्दीचे ‘काऊंटडाऊन’ सुरू झाल्याची भावना त्याच्या चाहत्यांमध्येही आहे. त्यामुळे सचिन निवृत्तीची घोषणा करू शकतो.
सचिनची पत्नी अंजली तेंडुलकर नागपूरला दाखल झाल्यामुळे सचिनच्या निवृत्तीचे ‘नगारे’ वाजू लागले आहेत. दरम्यान, चार वर्षांपूर्वी अंजली नागपूरला आली होती. यावेळी अनिल कुंबळे, सौरभ गांगुली आणि व्ही. व्ही. एस. लक्ष्मण यांना गौरविण्यात आले होते. त्यानंतर दोन वर्षांपूर्वी सचिन नागपूर कसोटीत ५० व्या शतकाच्या उंबरठ्यावर असतानासुद्धा अंजली नागपूरला गेली नव्हती. त्यामुळे अंजली संत्र्यांच्या शहरात दाखल झाल्यामुळे सचिनच्या निवृत्तीच्या चर्चांना उधाण आले आहे.
पाकिस्तानविरुद्ध तीन वनडे व इंग्लंडविरुद्ध जानेवारीमध्ये होणार्याा पाच वन-डे सामन्यांच्या मालिकेत खेळणार नसल्याची ‘अंदर की बात’ असल्यामुळे सचिन नागपूरला निवृत्त होईल असे ‘पडघम’ वाजू लागले आहेत. त्यामुळे अंजलीच्या येण्यामुळे सचिनच्या निवृत्तीला दुजोरा मिळत आहे.
सचिनसाठी चुकीचा खेळ
यशस्वी कारकीर्दीत सचिनसारख्या महान फलंदाजालाही ‘बॅडपॅच’ येऊ शकतो एखादी मोठी खेळी झाल्यावर त्याच्या धावांचा स्रोतही पुन्हा सुरू होऊ शकतो. नागपूरला फक्त अंजली गेली म्हणून काहीजण ‘पराचा कावळा’ करीत आहेत. हे चुकीचे आहे. यापूर्वीही अनेकदा अंजली सचिनचे सामने पाहायला आली आहे. त्यामुळे अंजलीचे येणे हे सचिनच्या निवृत्तीचे संकेत, असा खेळ करणे चुकीचे आहे, असे बीसीसीआयच्या सूत्रांनी स्पष्ट केले.