www.24taas.com, मुंबई
इंग्लंडविरूद्ध झालेल्या दोन्ही टेस्टमध्ये सचिन पूर्णपणे फ्लॉप ठरला. म्हणूनच मास्टर-ब्लास्टर खराब कामगिरीच्या चक्रव्यूहात अडकलाय असंच म्हणावं लागेल. त्याच्या या खराब कामगिरीमुळे आता टीकाकारांना आयतच कोलीत मिळालंय. सचिनच्या या खराब कामगिरीवर प्रतिक्रिया देताना ‘अंतिम निर्णय हा नेहमी सिलेक्शन कमिटीच घेते. माझ्या मते भविष्यातील वाटचालीविषयी सिलेक्शन कमिटी सचिनशी संवाद साधेल आणि त्यानंतरच निर्णय घेईल’ असं माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी म्हटलंय.
गेल्या काही दिवसांपासून सचिन रन्स करण्यासाठी धडपडत आहे. इंग्लंडविरूद्ध सुरू असलेल्या सीरिजमध्येही सचिनची अशीच अवस्था आहे. इंग्लंडविरूद्धच्या दोन्हीही टेस्टमध्ये मास्टर-ब्लास्टर पूर्णपणे फ्लॉप ठरला. वानखेडेवर टीम इंडिया संकटात असताना सचिन काहीच करू शकला नाही. यामुळे होम पिचवरील त्याच हे अपयश अधिकच उठून दिसलं. मुंबई टेस्टमध्ये सचिन दोन्ही इनिंग मिळून अवघे १६ रन्स करू शकला.
इंग्लंडविरूद्ध आतापर्यंत झालेल्या दोन टेस्टमध्ये सचिन ९.६६ च्या सरासरीने केवळ २९ रन्स करू शकला. यामध्ये सर्वाधिक रन्सचा आकडा हा १३ आहे. सचिनची ही लाजिरवाणी कामगिरी त्याच्या लौकिकाला साजेशी अशी अजिबात नाही. गेल्या १५ टेस्टमध्ये सचिन ८७० रन्स करू शकलाय. यामध्ये ९४ ही त्याची सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. महत्त्वाचं म्हणजे १५ टेस्टमध्ये सचिनने एकही सेंच्युरी लगावलेली नाही. सचिनने यापूर्वी शेवटची सेंच्युरी ही २ जानेवारी २०११ला केपटाऊनध्ये दक्षिण आफ्रिकेविरूद्ध झळकावली होती.
खराब कामगिरीमुळे सचिनवरील दबावही वाढला आहे. नेहमीच आपल्या टीकाकारांना बॅटने प्रत्युत्तर देणार सचिन आता कोलकाता टेस्टमध्ये कमबॅक करतो का? याकडेच आता त्याच्या चाहत्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे.