www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
आपल्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या विद्याचा अभिनयाचा प्रवास सुरू झाला तो छोट्या पडद्यापासून... मोठ्या पडद्यावर पाऊल टाकल्यानंतर `खान्स`ला टक्कर देणाऱ्या विद्याची पावलं आता मात्र पुन्हा एकदा छोट्या पडद्याकडे वळली आहेत.
८ मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिवसानिमित्त छोट्या पडद्यावर प्रसारित होणाऱ्या `नो मोर कमजोर` या कार्यक्रमाच्या होस्टच्या रुपात विद्या प्रेक्षकांना दिसणार आहे.
१९९५ ला `हम पांच`मधून विद्यानं आपल्या अभिनयाला सुरूवात केली होती. नुकतीच, ती फरहान अख्तरसोबत `शादी के साईड इफेक्टस` या सिनेमात दिसली होती. मोठ्या पडद्यावर आपल्या अभिनयाची छाप उमटवल्यानंतर आता विद्या पुन्हा एकदा `नो मोर कमजोर`मधून आपल्या सामाजिक जाणीवांसह प्रेक्षकांसमोर दाखल होतेय.
`नो मोर कमजोर` या कार्यक्रमात परिस्थितीशी दोन हात करत आपल्या समस्यांवर स्वत:च तोडगा काढणाऱ्या आणि इतरांसाठी प्रेरणा बनलेल्या स्त्रियांशी ती या निमित्तानं संवाद साधणार आहे.
`आम्ही जो कार्यक्रम करत आहोत तो सर्व वयोगटातील लोकांसाठी असेल. आम्ही लहान मुलांपासून सुरुवात केलीय. यानिमित्तानं मलाही एक वेगळीच शक्ती मिळाली` असं ३६ वर्षीय विद्यानं म्हटलंय. यामध्ये दाखवण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या कथा आपल्याला प्रोत्साहन देणाऱ्या आहेत.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.