कोलकता: 2016 च्या टी 20 वर्ल्ड कप फायनलमध्ये वेस्ट इंडिजच्या मार्लोन सॅम्युअल्सनं मॅच विनिंग खेळी केली. या खेळीनंतर सॅम्युअल्सनं ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू शेन वॉर्नवर टीका केली. माझा मॅन ऑफ द मॅचचा किताब मी शेन वॉर्नला समर्पित करतो. मी बॅटनं उत्तर देतो, माईकनं नाही, असा टोला सॅम्युअल्सनं वॉर्नला लगावला.
सॅम्युअल्स आणि वॉर्नमधल्या वादाला सुरुवात झाली ती ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅश लिगमध्ये. या मॅचमध्ये रेनेगेड्सकडून बॉलिंग करताना सॅम्युअल्सनं मेलबर्न स्टार्सचा बॅट्समन डेव्हिड हसीला दुसरी रन घेताना अडवलं. यावरून रेनेगेड्सचा कॅप्टन शेन वॉर्न चांगलाच भडकला.
यानंतर सॅम्युअल्स बॅटिंगला आलेला असताना शेन वॉर्ननं सॅम्युअल्सला उचकावलं. शेन वॉर्ननं सॅम्युअल्सचा टी शर्टही खेचला. इतकच नाही तर पुढच्या ओव्हरला शॉर्ट कव्हरला उभ्या असलेल्या वॉर्ननं बॉल सॅम्युअल्सला फेकून मारला, यानंतर भडकलेल्या सॅम्युअल्सनं बॅट भिरकावून दिली.
हा वाद इतका विकोपाला गेला अखेर अंपायरना मध्ये पडावं लागलं. या वादामुळे शेन वॉर्नला एका मॅचची बंदी आणि दंडाला सामोरं जावं लागलं होतं. तसंच शेन वॉर्ननं नंतर दिलगिरी व्यक्त केली होती.
यानंतर ऑस्ट्रेलिया आणि वेस्टइंडिजमधल्या सीरिजवेळी चॅनल 9 कडून कॉमेंट्री करताना शेन वॉर्ननं होर्बाटमधल्या पहिल्या टेस्टवेळी पुन्हा एकदा सॅम्युअल्सवर टीका केली.
सॅम्युअल्सकडे अनुभव असूनही या मॅचमध्ये त्यानं काहीच केलं नाही. बाऊंड्री लाईनवर उभं राहून त्यानं फिल्डिंग केली पण त्यानं कोणताच जोश दाखवला नाही, असं वॉर्न म्हणाला होता.
त्यानंतर सिडनीमध्ये झालेल्या टेस्टवेळी सॅम्युअल्स रन आऊट झाला. या रन आऊटवरूनही वॉर्ननं सॅम्युअल्सला टोला लगावला होता.
2016 च्या टी 20 वर्ल्ड कपच्या भारताविरुद्धच्या सेमी फायनलमध्ये महत्त्वाच्या क्षणी सॅम्युअल्स आऊट झाला. नंबर 3 वर येणाऱ्या बॅट्समननं अशा प्रकारे आऊट होणं लाजीरवाणी गोष्ट असल्याचं वॉर्न म्हणाला होता.