नवी दिल्ली : आयपीएलमधील अनेक टीम्सना आयपीएलच्या लिलावाच्या महत्त्वाच्या नियमांमध्ये बदल हवे आहेत. जर बीसीसीआयने ही मागणी मान्य केली तर अनेक दिग्गज खेळाडू २०१७ च्या आयपीएलमध्ये वेगळ्या टीम्समध्ये खेळताना दिसतील.
सध्याच्या नियमांनुसार टीम पाच खेळाडूंना 'रिटेन' म्हणजेच आपल्या संघात कायम ठेऊ शकतात तर बाकीचे खेळाडू लिलावात खरेदी केले जातात. मात्र, नियामांमध्ये बदल झाल्यास 'आयपीएल-१०' मध्ये मात्र हा नियम मोडीत निघू शकतो. त्यामुळे, संघ मालकांनी सर्वच खेळाडुंना पुन्हा विकत घ्यावे लागेल.
नियमांमध्ये बदल झाल्यास महेंद्र सिंह धोनी, विराट कोहली, रोहीत शर्मा एबी डिव्हिलियर्स यांसारख्या दिग्गज खेळाडूंवरही बोली लागू शकते आणि ते दुसऱ्या टीमचा हिस्सा बनू शकतात.
पाच खेळाडू 'रिटेन' करण्याऐवजी पाच मॅचिंग कार्ड दिले जावेत, अशी मागणी काही टिम्समधून पुढे आली होती. २०१४ च्या कॉन्ट्रॅक्टनुसार पाच खेळाडू रिटेन केल्यानंतर सहाव्या खेळाडूसाठी बोली लावली जाते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बीसीसीआय या सूचनांवर चर्चा करणार आहे. टीममध्येही याबाबत मत भिन्नता आहे. बीसीसीआयला आयपीएलमध्ये टीम बॅलेन्स हव्या आहेत. त्यामुळे बीसीसीआय सर्व खेळाडूंच्या लिलाव प्रक्रियेला मान्यता देऊ शकते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.