सिंगापूर: डब्ल्यूटीए स्पर्धेतील महिला दुहेरीच्या अंतिम फेरीत भारताच्या सानिया मिर्झा आणि झिम्बाब्वेच्या कॅरा ब्लॅकनं दिमाखदार विजय मिळवून विश्वविजेतेपदक पटकावलं आहे. मिर्झा आणि ब्लॅक या जोडीनं तैपेईच्या सू वेई सेह आणि चीनच्या शूई पेंग यांचा ६-१, ६-० असा पराभव केला.
सिंगापूरमध्ये सुरु असलेल्या महिला टेनिस असोसिएशनच्या (डब्ल्यूटीए) विश्व चॅम्पियनशिपमधील महिला दुहेरीत रविवारी सानिया मिझा - कॅरा ब्लॅक व सू वेई सेई - शूई पेंग या जोडीत अंतिम सामना रंगला. ५९ मिनीटं चाललेल्या या सामन्यात मिर्झा - कॅरा या जोडीचंच वर्चस्व दिसत होतं. विरोधी दुकलीला फक्त एकाच गेममध्ये विजय मिळवता आला. मात्र यानंतर सानिया - कॅरा या जोडीनं त्यांना संधीच दिली नाही. ६-१ आणि ६-० नं त्यांना धूळ चारली.
सानिया - कॅरा या जोडीचं महिला दुहेरीतील हे पाचवं विजेतेपद आहे. सानिया - कॅरा या जोडीचा हा शेवटचा सामना होता. यानंतर सानिया आणि कॅरा एकत्र खेळणार नाही. सानियानं पुढील वर्षीपासून तैपेईच्या सू वेई सेईसोबत खेळण्याचा निर्णय घेतला आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.