'स्टेट चॅम्पियन'वर धुणी-भांडी करण्याची वेळ...

भारतात असेही काही क्रीडापटू आहेत की ज्यांच्यामध्ये प्रतिभा भरपूर आहे. मात्र केवळ गरीबीमुळे त्यांना जे मिळेल ते काम करुन आपला उदरनिर्वाह करावा लागतोय.

Updated: Apr 8, 2015, 02:35 PM IST
'स्टेट चॅम्पियन'वर धुणी-भांडी करण्याची वेळ...  title=

हरियाणा : भारतात असेही काही क्रीडापटू आहेत की ज्यांच्यामध्ये प्रतिभा भरपूर आहे. मात्र केवळ गरीबीमुळे त्यांना जे मिळेल ते काम करुन आपला उदरनिर्वाह करावा लागतोय.

हरियाणातील स्टेट चॅम्पियन बॉक्सर रिशु मित्तलवर तर घरकाम आणि भांडी घासून आपला उदरनिर्वाह करावा लागत आहे. राज्यस्तरावर बॉक्सिंगमध्ये गोल्ड मेडलला गवसणी घालणाऱ्या रिशुचे आई-वडील हयात नसून भाऊ एका दुकानात कमी पगारावर काम करतो. यामुळे रिशुला लोकांची भांडी घासून आपलं पोट भरावं लागतं आहे.

रिशू सकाळी घरकाम करते मग शाळेत जाते आणि संध्याकाळी ती बॉक्सिंगची प्रॅक्टीस करते. रिशू सध्या दहावीमध्ये आहे. सध्या एक कुटुंब तिच्या शालेय शिक्षणाचा खर्च उचलत आहे. आपला उदरनिर्वाही करण्यासाठी रिशू आपल्या घरमालकाच्या घरीच साफ-सफाईचं काम करतेय.

तिनं गेल्या डिसेंबरमध्ये ग्वालियर इथं झालेल्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये हरियाणाचं प्रतिनिधित्वही केलंय. तिनं स्टेट लेव्हल बॉक्सिंग चॅम्पियनशीपचा खिताबही आपल्या नावावर नोंदवलाय. याशिवाय काही स्पर्धांमध्येही तिनं मेडलची कमाई केलीय. बॉक्सर मेरी कॉमप्रमाणे ऑलिम्पिक मेडल पकटाकवण्याचं तिचं स्वप्न आहे.  

करोडोंची बोली लावली जाणारं आयपीएल सध्या सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर रिशूची कहाणी खूप काही सांगून जाते. एका बॉक्सरसाठी चांगलं डाएट खूप महत्त्वाचं असतं पण रिशू मात्र आपलं दोन वेळचं जेवणंही मोठ्या कष्टानं मिळवतेय. पण, ती खूप मेहनती मुलगी आहे. तिला जर प्रोत्साहन मिळालं तर ती देशाचंही नाव मोठं करू शकते, असा विश्वास तिच्या कोच राजेंद्र सिंहनं व्यक्त केलाय. यासाठी त्यांनी सरकारकडे किंवा एखाद्या संस्थेकडे रिशूच्या मदतीची मागणी केलीय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.