मुंबई : कटकमध्ये झालेल्या दुसऱ्या वनडेमध्ये भारतानं इंग्लंडचा 15 रननी पराभव केला आणि मालिकाही खिशात टाकली. या विजयानंतरही कॅप्टन विराट कोहली मात्र काही खेळाडूंवर नाराज असल्याचं बोललं जात आहे. के.एल.राहुल, शिखर धवन, हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराह यांच्या कामगिरीबाबत कोहलीनं ड्रेसिंग रूममध्ये नाराजी व्यक्त केल्याचं बोललं जात आहे.
के.एल.राहुलकडे मोठी धावसंख्या उभारायची क्षमता असतानाही चांगल्या विकेटवर कमी धावसंख्येवर राहुल आऊट होत असल्याची चिंता कोहलीनं व्यक्त केली आहे. तर शिखर धवनला एवढ्या संधी देऊनही त्याचं सोनं करता आलं नाही, यामुळे धवनला पुन्हा एकदा प्रथम श्रेणी क्रिकेट खेळवण्यासाठी पाठवण्यात येऊ शकतं.
कोहलीच्या या लिस्टमध्ये असलेला तिसरा खेळाडू म्हणजे हार्दिक पांड्या. बॅटिंग करताना 30 च्या आसपास स्कोअर आणि बॉलिंगवेळी पांड्या 5 ओव्हर टाकत असल्यामुळे ऑल राऊंडरसाठी साजेशी खेळी पांड्या खेळत नसल्यामुळे कोहलीनं चिंता व्यक्त केली आहे.
यॉर्करचं भेदक अस्त्र असणाऱ्या जसप्रीत बुमराहला इंग्लंडविरुद्धच्या दोन्ही मॅचमध्ये फारशी चमकदार कामगिरी करता आली नाही. कटक वनडेमध्ये तर बुमराहनं 9च्या सरासरीनं रन दिल्या. आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये बुमराहच भारतीय बॉलिंगचं नेतृत्व करणार असल्यामुळे कोहलीनं बुमराहला यॉर्करवर लक्ष द्यायला सांगितलं आहे.