www.24taas.com, कोलंबो
टी20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सुपर 8 फेरीमध्ये पाकिस्तानसोबत होणाऱ्या मॅचमध्ये भारताचं काहीही खरं नाही असचं एकूण दिसतं आहे. कारण की, धोनी आणि सेहवाग यांच्यात पुन्हा एकदा शीतयुद्ध सुरू झालं आहे. रविवारी पाकिस्तानविरुद्ध भारताचा अतिशय महत्त्वाचा सामना आहे. परंतु, विरेंद्र सेहवागने आज सराव केला नाही. त्याने फुटबालच्या सरावात सहभाग घेतला. परंतु, फलंदाजी केली नाही. त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
शुक्रवारच्या सामन्यात भारतीय फलंदाजांची कांगारुंनी त्रेधा तिरपिट तर उडविलीच, शिवाय गोलंदाजांचीही धुलाई केली. तरीही कर्णधार महेंद्र सिंग धोनीने पराभवाचे खापर खेळाडुंच्या कामगिरीवर नव्हे, तर पावसावर फोडले आहे. ऑस्ट्रेलियाचा डाव सुरु होताच पाऊस सुरु झाला होता. त्यामुळे फिरकीपटुंना अडचण निर्माण झाली, असे धोनीने म्हटले आहे. परंतु, कालच्या पराभवावरुन धोनीवर कडाडून टीका होत आहे.
सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत धोनीला सेहवागबाबत प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाचे उत्तर देण्याचे टाळून तो म्हणाला, एखाद्या खास खेळाडूला बसविण्याचे कारण सांगणे कठीण आहे. परंतु, धोनीच्या अतिशय जवळचा मानला जाणारा सुरेश रैना म्हणाला, सेहवागशिवाय पुढचे सामने जिंकणे अतिशय अवघड आहे. तो धोकादायक खेळाडू आहे. विरोधी गोलंदाजांमध्ये सेहवागची धडकी भरते. पुढचे दोन्ही सामने तो खेळेल, अशी अपेक्षा आहे.