www.24taas.com, झी मीडिया, लंडन
मानवी मूत्रामध्ये अनेक रोग बरे करण्याची क्षमता आहे. शिवांबूची शक्तीचा आणखी एक फायदा करून भविष्यात मोबाईल फोन चार्ज होऊ शकणार आहे! ब्रिटनमधील वैज्ञानिकांनी दावा केला की मानवी मूत्राचा वापर करून ते मोबाईल फोनची बॅटरी चार्ज करू शकतात.
ब्रिटनमधील ब्रिस्टल रोबोटीक्स् प्रयोगशाळेमधील वैज्ञानिकांनी हा महत्त्वपूर्ण शोध लावला आहे. आत्तापर्यंत जगात कोणीही मानवी मूत्रापासून वीजनिर्मिती केलेली नाही. हा अशा स्वरूपाचा पहिलाच प्रयोग आहे. यामुळे आम्ही अत्यंत उत्साहित झालो आहोत, असे या प्रयोगावर काम करणाऱ्या डॉ. इओनीस एरोपोलस यांनी सांगितले.
मानवी मूत्र हे कधीच संपणारे नाही. मानवी मूत्राचा वापर करून मोबाईल फोन चार्ज करण्यात आम्ही यश मिळविले आहे. पवन वा सूर्यासारख्या कोणत्याही बेभरवशाच्या संसाधनावर हा शोध अवलंबून नाही, हे या शोधाची महत्त्वाची बाब आहे, असे एरोपोलस यांनी सांगितले.
मानवी मूत्रामुळे चार्ज झालेल्या मोबाईलद्वारे एसएमएस, इंटरनेट वा एक छोटा दूरध्वनी, अशा सर्व सुविधा वापरता येत असल्याचे एलोपोलस यांनी सांगितले.
ही संकल्पना आम्ही यशस्वीपणे पडताळून पाहिली आहे. आता या प्रक्रियेवर अधिकाधिक काम करून मोबाईलची बॅटरी पूर्णपणे चार्ज करता येईल, इतपत काम करणे आवश्य क आहे, असे एलोपोलस यांनी सांगितले. या संदर्भात आणखी संशोधन करण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.