www.24taas.com, मुंबई
शिक्षणाच्या अधिकाराच्या कायद्यात काही महत्वाच्या बदलांसाठी आणि पहिलीपासून पदवीपर्यंतचे शिक्षण मोफत देण्याच्या मागणीसह इतर मागण्यांसाठी शिक्षक काल मुंबईच्या रस्त्यावर उतरले. शिक्षक, संस्थाचालक आणि पालक या तिघांच्या दुर्मिळ एकीचा प्रत्यय मोर्चात दिसून आला. राज्यभरातून हजारो शिक्षक यात सहभागी झाले होते.
विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी शिक्षक रस्त्यावर उतरले. दादरच्या शिवाजी पार्कपासून या मोर्चाला सुरुवात झाली. शिक्षक, संस्थाचालक आणि पालक या मोर्चात सहभागी झाले होते. शिक्षणाच्या अधिकाराच्या कायद्यात बदल करण्यात यावेत. तसंच पहिलीपासून पदवीपर्यंतचे शिक्षण मोफत देण्यात यावे. या प्रमुख मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला.
नव्या शिक्षणाच्या अधिकाराच्या कायद्यानुसार प्रत्येक शाळेला 25 टक्के जागा गरीब मुलांसाठी राखीव ठेवाव्या लागणार आहेत. या मुलांचा खर्च शाळा करत असल्या तरी त्याचा परतावा शासनाकडून मिळत नसल्यानं शाळांना आणि इतर मुलांच्या पालकांना भुर्दंड सोसावा लागत आहे. यामुळं शाळा चालवणं कठीण जात असल्याचं संस्था चालकांचं म्हणणं आहे.
या विशाल मोर्चाच्या माध्यमातून संस्थाचालकांसह शिक्षकांनी आपली एकी आणि ताकद दाखवून दिलीय. हा मोर्चा म्हणजे सरकारसाठी वॉर्निंग बेल असून सरकारनं मागण्यांकडं दुर्लक्ष केल्यास मोठ्या आंदोलनाची घंटी वाजवायची तयारी शिक्षकांनी ठेवलीय.