`डेस्कटॉप`वरून सुरू करा व्हॉटसअॅप, बीबीएम...

तुम्ही तुमच्या स्मार्टफोनवरून व्हॉटसअॅप, लाइन, बीबीएम सारखे अॅप्लिकेशन वापरत असाल... पण, हेच अॅप्लिकेशन तुमच्या पर्सनल कम्प्युटरवर कसे वापरायचे? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर...

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Nov 20, 2013, 10:39 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
तुम्ही तुमच्या स्मार्टफोनवरून व्हॉटसअॅप, लाइन, बीबीएम सारखे अॅप्लिकेशन वापरत असाल... पण, हेच अॅप्लिकेशन तुमच्या पर्सनल कम्प्युटरवर कसे वापरायचे? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर आम्ही तुम्हाला याचं उत्तर इथं देतोय. हे सगळे अँन्ड्रॉईड अॅप्लिकेशन तुम्हाला तुमच्या पीसीवरही वापरता येतील, पण त्यासाठी तुम्हाला ‘ब्ल्यू स्टॅक्स’ तुमच्या डेस्कटॉपवर इन्स्टॉल करावं लागणार आहे.
ब्ल्यू स्टॅक्स हा कम्प्युटरवर अँड्रॉइडवापरण्यासाठीचा चांगला पर्याय आहे. ब्ल्यू स्टॅक्स इनस्टॉल केल्याने विंडोजवर अँड्रॉइडवर चालणारी सर्व अॅप्स वापरली जाऊ शकतात. अँड्रॉइडची अॅप्स विंडोजवर वापरण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे. अँड्रॉइडची सर्व अॅप्स ब्ल्यू स्टॅकमुळे वापरता येत असली, तरी त्याआधारे आयफोन्सची अॅप्स वापरता येतीलच, असे नाही. विंडोज सिस्टिम असलेल्या कम्प्युटरवर ब्ल्यू स्टॅक्स सहजपणे रन होते. अॅपलच्या मॅकवरही ब्ल्यू स्टॅक्स उपलब्ध आहे. परंतु, अद्याप त्याची चाचणी करण्यात आलेली नाही.
एकदा ब्ल्यू स्टॅक्स इनस्टॉल केल्यानंतर अॅप डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला त्याच्या आयकॉनवर क्लिक करावे लागेल. त्यानंतर, ब्ल्यू स्टॅक्स अॅप प्लेअर स्क्रीनच्या डावीकडील वरच्या बाजूस असलेल्या सर्च ऑप्शनवर क्लिक करून तेथे तुम्हाला हवे असलेले मोबाइल अॅप तुम्ही सर्च करू शकता. ब्ल्यू स्टॅक्सच्या आयकॉनवर क्लिक केल्यानंतर कोणतेही अॅप डाउनलोड करण्याआधी तुम्हाला तुमचा गुगल अकाउंट लिंक करण्याची विचारणा करेल. अकाउंट ओपन केल्यानंतर ब्ल्यू स्टॅक्स गुगल प्लेला कनेक्ट होईल, आणि तेथून तुम्हाला हवी असलेली अॅप्स उपलब्ध करून देईल. तुम्हाला तुमचा नेहमीचा गुगल अकाउंट यासाठी वापरायचा नसल्यास तुम्ही ब्ल्यू स्टॅक्ससाठी एखादा वेगळा नवीन अकाउंटही सुरू करू शकता.
ज्याप्रकारे अँड्रॉइड फोन्स अथवा टॅब्लेट्स एखादे अॅप डाउनलोड करतात, त्याचप्रकारे गुगल प्लेशी कनेक्ट झाल्यानंतर ब्ल्यू स्टॅक्सवर अॅप डाउनलोड करता येतात. तुम्ही सर्च केलेले अॅप उपलब्ध झाल्यास इन्स्टॉल ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही संबंधित अॅप डाउनलोड करू शकता. इन्स्टॉल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ब्ल्यू स्टॅक्सअॅप प्लेअर विंडोच्या तळाशी दिसणाऱ्या घराच्या आकाराच्या आयकॉनवर क्लिक करा. तेथे तुम्हाला नव्याने इन्स्टॉल झालेले अॅप दिसेल. तेथे संबंधित अॅप न दिसल्यास विंडोच्या उजव्या बाजूस असणाऱ्या ` ऑल अॅप्स ` या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही ते अॅप पाहू शकता.
मोबाइलवरील अन्य मेसेजिंग अॅप्सही विंडोज सिस्टिम असलेल्या कम्प्युटर अथवा टॅबवर इन्स्टॉल करता येऊ शकतात आणि विंडोजवरील ब्ल्यू स्टॅक्स अॅप प्लेअर सुरू करून त्यामधून ती वापरता येऊ शकतात. ब्ल्यू स्टॅकमधून अन्य अँड्रॉइड अॅप्स वापरता येत असल्याने विंडोज ८ मध्ये उपलब्ध नसलेली अॅप्स तुम्ही याप्रकारे वापरू शकता. अँड्रॉइडचे विविध गेम्सही ब्ल्यू स्टॅकच्या मदतीने विंडोजवर खेळले जाऊ शकतात.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.